९ जानेवारीला नोटाबंदीविरोधात जिल्ह्या-जिल्ह्यात तीव्र आंदोलन - खा. शरद पवार

गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (10:32 IST)
आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यस्तरीय बैठक राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार  तसेच पक्षाचे पदाधिकारी, सर्व आमदार, प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर शरद पवार यांनी सडकून टीका केली.
 
८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी निर्णय जाहीर केला आणि ८० टक्के चलन असलेले ५००, १००० रुपये कागदाचा तुकडा झाला. लोकांनी स्वागत केले. सायकलवाला स्कुटरवाल्याचा, स्कुटरवाला हा चार चाकी गाडी वाल्याचा द्वेष करतो. या उतरंडीमुळे लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले. सामान्य माणसांकडे काळा पैसा नसतो. शेतकऱ्याने उत्पन्न काढल्यावर जे काही पैसे येतात ते रोखीत असतात. तो काही काळा पैसा नसतो, असे पवार यावेळी म्हणाले. पुढे, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना ७० हजार कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा अंदाज केला होता. पण यांनी तर एकदम १४ लाख कोटी पैसा चलनातून काढून घेतला. यांना अपेक्षा होती की ३ ते ४ लाख कोटी काळा पैसा निघेल. पण हा अंदाज फेल जाताना दिसत आहे. जेवढा पैसा रद्द केला तेवढा जवळपास बँकेत गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
आपल्या शेजारी नेपाळ, भूटान या देशात भारतीय चलन चालतं. या दोन देशांनी जवळपास ८० हजार कोटी भारताकडे जमा केले आहेत. यांच्याकडे अचानक एवढा पैसा गेला कसा? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. मोदीजी सांगत आहेत. श्रीमंत माणसाची मी झोप उडवली आणि गरीब निवांत आहे. पण बँकेच्या रांगेत कुठेच श्रीमंत माणूस उभा दिसत नाहीत. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस रांगेत उभे आहेत. परिस्थिती पूर्ववत व्हायला हे ५० दिवस म्हणत असले तरी चिदंबरम यांच्या मतानुसार कमीतकमी सहा महिने ते दीड वर्ष जाईल असे वाटते, अशी माहिती त्यांनी दिली.
 
या सगळ्यावरील संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ९ जानेवारी २०१७ रोजी पूर्ण दिवस जिल्ह्या-जिल्ह्यांतून नोटाबंदीविरोधात आंदोलन करण्यात येईल, असे शरद पवार यांनी याठिकाणी घोषित केले. कोणत्याही प्रकारचा विध्वंस न करता, कायदा न मोडता ज्या ज्या प्रकारे शक्य आहे, त्या त्या प्रकारे आंदोलन करा. संपूर्ण देशाला या आंदोलनाबाबत कळले पाहीजे याचीही व्यवस्था करा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
 

वेबदुनिया वर वाचा