जेष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य निधन

मंगळवार, 3 एप्रिल 2018 (11:03 IST)
जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य (८८) यांचे  पुण्यात निधन झाले. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता. त्या आजारावर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
 
भाई वैद्य यांचा परिचय
भाईंनी आयुष्यभर समाजवादी विचारांची कास धरली. समाजाच्या तळागाळातील वर्गातून शेकडो कार्यकर्ते तयार केले. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान आणि भाई वैद्य ही समाजवादी टीम देशभरात प्रसिद्ध होती. भाईंनी गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विविध कामगार चळवळीत भाग घेतला. १९७४ साली ते पुण्याचे महापौर होते. त्याच सुमारास आणिबाणी पुकारण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी मोठा मोर्चा काढला. त्यात भाईंना स्थानबद्ध करण्यात आले होते. आणिबाणी संपेपर्यंत ते स्थानबद्ध होते. पुण्याच्या गुरुवार पेठेतून ते महापालिकेवर निवडून आले. आणिबाणी उठल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत (१९७८) ते भवानी मतदार संघातून निवडून आले. त्यांना गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले होते. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी पोलीसांच्या गणवेशात बदल केला. पोलीसांच्या गणवेशात हाफ पँटच्या ऐवजी फूल पँट आली. अलीकडे त्यांनी समाजवादी जनपरिषद हा पक्ष स्थापन केला होता.
 
माजी पंतप्रधान कै.चंद्रशेखर यांच्या गाजलेल्या भारत यात्रेत भाई हे चंद्रशेखर यांचे सहकारी राहिले. पुण्याजवळ परंदवडी येथे भारतयात्रा केंद्र स्थापन झाले. भाई त्या केंद्राचे अनेक वर्षे संचालक होते. चंद्रशेखर यांच्या खेरीज विश्वनाथ प्रताप सिंग, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मोहन धारीया, शरद पवार, बिजू पटनाईक, बापू काळदाते आदी नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती