शिर्डी शेजारील ह्या तालुक्यात रविवारपासून जनता संचारबंदी !

रविवार, 9 मे 2021 (13:12 IST)
शिर्डी शेजारी असलेल्या अहमदनगर येथील महत्वाच्या कोपरगाव शहरासह तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे रविवार दि. ९ मे दुपारी ३ ते शनिवार दि. १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात जनता संचारबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.
 
पत्रकात वहाडणे यांनी म्हटले, की गेल्या आठवड्यात सात दिवसांचा जनता कफ्र्यू पार पाडल्यानंतर शनिवार, रविवार दोन दिवस जनता कफ्र्यूला विश्रांती देण्यात येऊन पुन्हा सात दिवसांचा जनता कफ्र्यू घोषित करण्यात आला आहे.
 
शनिवार दि. ८ मे व रविवार दि. ९ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत जीवनावश्यक बाबींबरोबरच किराणा व भाजीपाला- फळांची विक्रीही सुरू राहणार आहे. भाजीपाला- फळांची विक्री फक्त बाजार ओट्यावर- बाजारतळ येथेच करता येणार आहे.
 
व्यवस्थित नियोजन व्हावे, रस्त्यात अडथळा होऊ नये, बेसुमार गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्यच आहे. शनिवारी व रविवारी सकाळी ७ वाजता आपण इंदिरा शॉपिंगजवळ एकत्र जमावे.
 
रविवार दि. ९ मे दुपारी ३ ते शनिवार दि.१५ मे सकाळी ७ पर्यंत जनता संचारबंदी यशस्वी करायची आहे. आपापल्या प्रभागात कुणीही रस्त्यावर येऊ नये, संचारबंदीचे नियम पाळावेत यासाठीही आपण प्रयत्न करावेत.
 
कारण कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. तसे केले तरच कोरोनाचा प्रभाव कमी करता येणार आहे. या काळात किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद राहणार आहे.
 
दूध विक्रेत्यांना एका जागी उभे राहून विक्री करता येणार नाही; मात्र औषध दुकाने, दवाखाने व रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार असली, तरीही दुकानात औषधे वगळता इतर वस्तू विकता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती