मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद

गुरूवार, 7 जुलै 2022 (21:09 IST)
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याकारणाने मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
 
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात  सरासरी १३८ मिमी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम तैनात आहे.
 
ठाणे जिल्ह्यात सरासरी ९५.७ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत.
 
मुंबईत कुलाबा येथे ११०.६ मिमी तर सांताक्रूझ येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या तीन टीम या आधीच तैनात आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन अतिरिक्त टीम अशा एकूण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
 
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०६ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ११५ कुटुंब म्हणजे एकूण २८९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती