मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत नव्हते. यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेने ही सुटकेचा निःश्वास सोडला होता. असे असतानाचा आता मार्च महिन्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२६ रुग्ण आढळून आले असून यातील ७१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. गुरुवारी ठाणे जिल्ह्यात ४० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २८ रुग्ण ठाणे शहरातील आहेत. नवीमुंबईत ७, कल्याण डोंबिवली ३, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण प्रत्येकी १ रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रूग्णांची संख्या १३३ इतकी झाली आहे. तर, जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण ठाणे शहरातील आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.