राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. पंजाब पोलिसांसह मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्स (AGTF) यांनी या प्रकरणात आणखी एका आरोपीला पंजाबच्या फाजिल्का येथून अटक केली आहे. आकाशदीप करजसिंग गिल असे अटक आरोपीचे नाव आहे.
यापूर्वी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि अन्य चार आरोपींना मुंबई न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) आणि मुंबई गुन्हे शाखेने रविवारी शूटर शिवकुमार (20) आणि त्याच्या चार साथीदारांना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली.महाराष्ट्राचे माजी मंत्री, 66 वर्षीय सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.