पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार देणार- अजित पवार

मंगळवार, 27 जुलै 2021 (08:00 IST)
राज्यात महापुरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर निघाले.मात्र हवामान खराब असल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत.त्यामुळे त्यांनी सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील भिलवडी,माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची अजित पवार यांनी पाहणी केली.पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले की,पूरग्रस्तांच्या मदतीबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचेही यावेळी अजित पवारांनी जाहीर केले.
 
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवासह अन्य दोन तालुक्यातील 18 सर्कलमध्ये 103 गावे पुराने बाधित झाले आहेत. राज्यात 2005 नंतर 2019 आणि आता 2021 मध्ये मोठा पूर आला आहे. अशी पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने बोटी लागतात. त्यामध्ये आता 80 बोटी आहेत. 1700 लाईव्ह जॅकेट पुरवण्यात आली आहेत. एनडीआरएफची दोन पथकं सांगलीत तैनात करण्यात आली आहेत. यातील एका पथकात 21 जवान आहेत. सांगलीतील चार तालुक्यात एकूण 110 जवान लोकांच्या मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले असून त्यांच्याकडे 3 बोटी आहेत. सांगलीत 24 ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. 2019 मध्ये 105 गावे बाधित झाली होती. तर 81 हजार कुटुंब बाधित झाली होती. आता 2021 मध्ये 103 गावे पूरामुळे बाधित झाली असून 41 हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. तर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

सात जिल्ह्यांचा विचार करता सांगली,मिरज,कुपवाड हे महत्त्वाचे शहर बाधित झाल्यामुळे या शहरांतून मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी 700 शासकीय छावण्या निर्माण करण्यात आल्या आहेत. तिथे सर्वांना जेवण वगैरे दिले जात असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागातील चीफ इंजिनिअर अधिकार्‍यांची टीम सात जिल्ह्यांत पाठवण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांचे नुकसान, पूलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरड प्रवण गावं आणि पूर प्रवण गावं यामध्ये नेहमीचे असणारे दरड प्रवण गावं सोडून दुसर्‍याच गावांमध्ये दरड कोसळल्या आणि तिथे जास्त जीवितहानी झाली आहे. तळीये गावाला याचा मोठा फटका बसला आहे. सातार्‍यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठे नुकसान झाले आहे. सातार्‍यात बहुतांश भागात प्राणीहानी झाली आहे. तर मनुष्य हानी झालेली नाही. वायुदलाकडून जेवणाची पाकिटे वाटली जात आहेत. कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाले. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपल्याला नेहमीच अशा प्रकारची परिस्थिती आल्यावर एनडीआरएफ, कोस्टगार्ड, नेव्हीची मदत लागते. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का? याचा विचार सुरु आहे. रायगड, रत्नागिरीला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. याचा चांगला उपयोग होईल आणि वेळेचीही बचत होईल. भीमा खोर्‍यात सर्व धरणांची यंदा टक्केवारी 60 आहे. गेल्यावर्षी 25 टक्के होती. तर कृष्णा खोर्‍यातील धरणे गेल्यावर्षी 50 टक्के भरली होती. यंदा 85 टक्के भरल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पूर ओसरल्यानंतर आता पूरग्रस्त भागात रोगराईची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. औषधांचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर, बंद पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्यभरातून धान्य, मदत मिळत आहे. राज्य सरकार शंभर टक्के मदत करणार यात दुमत नाही.तौक्ते, निसर्ग वादळ आले तेव्हा एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवत अडीच टक्के मदत केली होती.उद्या किंवा परवा मदतीबाबत निर्णय जाहीर होईल. केेंद्राने केेंद्राची जबाबदारी पार पाडावी. राज्य सरकार म्हणून आम्ही तसूभरही मदत करण्यास मागे पडणार नसल्याची ग्वाहीच अजित पवारांनी दिली. जनतेनेही फुल ना फुलाची पाकळी म्हणून पुरग्रस्तांना मदत करावी.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार,खासदार,मंत्री यांचे एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांना देणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती