राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचा बट्टय़ाबोळ केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेली आरक्षणे काढून जाती-पातीत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे; मात्र, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सळो की पळो करून पुरते वस्त्रहरण करणार आहे, असा कडक इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी रविवारी दिला.
शहर काँग्रेसमार्फत दापोडी येथे रविवारी पिंपरी ब्लॉक कार्यकर्ता मेळावा आणि राणे यांची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या जाहिरातबाजीचा पंचनामा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत छाजेड, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, मंत्रिमंडळाला जनतेच्या हिताची अथवा जबाबदारीची जाणीव नाही. वर्षभरापासून 38 ते 40 हजार कोटींच्या विकास योजना सरकारने बंद केल्या. जलशिवार योजनेची कामे जनतेच्या पैशांमधून झाली. राज्यातील 14 मंत्री भ्रष्टाचारी असल्याचे पुरावे दिले; परंतु, मुख्यमंर्त्यांनी त्यांना क्लीन चिट देण्याचे काम केले. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत घोषित 8 लाख कोटींपैकी 1 लाख कोटी रुपयांच्या उद्योगांचे दहा प्रस्ताव आले आहेत. शिक्षकांवर पोलिसांकरवी लाठीमार करून गुंडांना हार घालून पक्षप्रवेश दिला जात आहे. विरोधकांच्या कुंडल्या तयार करण्याची भाषा केली जात आहे. सरकारच्या बेबंदशाहीमुळे अधिकारी बेभान झाले आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कोण म्हणते काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार. आज ज्यांना रुचत नाही, तेच आघाडीची भाषा करत आहे. पक्षातील काही स्वार्थी माणसे जिथे सत्ता आहे, तिथे जातात. आयाराम-गयारामचे आणि गुंड-पैसा आणि सत्तेच्या जीवावर सत्ताप्राप्तीचे दिवसही सरले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लबाडांना पुन्हा पक्षप्रवेश दिला जाऊ नये. विधानपरिषदेसाठी आघाडी झाली नाही, तर ‘अकेला चलो रे’चा नारा घेऊन पुढे जाऊ.
चंद्रकांत छाजेड, कविचंद भाट, कैलास कदम यांनीही विचार मांडले. बाळासाहेब साळुंके यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रास्ताविक केले.