महाविकास आघाडीच्या मुंबई येथील मोर्चाला काही वेळात सुरूवात होणार आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.दक्षिण मुंबईत भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानापासून ते टाईम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत हा मोर्चा असेल.
या मोर्चासाठी नेते-कार्यकर्ते राज्यभरातून दाखल होण्यास आज सकाळपासूनच सुरुवात झाली होती.
उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य तीन पक्षांचे नेते आधी एके ठिकाणी जमतील. त्यानंतर ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.
महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी 2 हजारहून अधिक पोलीस तैनात आहेत.
भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या मैदानापासून ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनसमोरील टाईम्स आॅफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. इथेच व्यासपीठ असेल. साधारण 11.30 वाजता मोर्चा सुरु होईल, अशी माहिती बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी दिली.
महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला - संजय राऊत
महाराष्ट्रातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
मोर्चाला सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळ आधी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता येणार नाही. सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार पाडलं, त्याचा हा बदला आहे. उद्योग इतर राज्यांमध्ये नेले जात आहेत, त्याविरोधातील हा आक्रोश आहे. हा सुरू राहील."
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यापासून तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. अपमान करणाऱ्यांचं तुम्ही समर्थन करता, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं नाव घेणं सोडून द्या," असं राऊत यांनी म्हटलं.
झोपलेल्या सरकारला उठवण्याचा आमचा प्रयत्न – रोहित पवार
महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
आपलं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, त्यामुळे थोर व्यक्तींविरोधात बोललं तरी चालतं, असा अहंकार त्यांच्या मनात आहे. हाच अहंकार आम्हाला मोडून काढायचा आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी इथले प्रोजेक्ट नेण्यात आले. आता कर्नाटकची निवडणूक होणार आहे, त्यासाठीही काही केलं जात आहे.
भाजपचं माफी मांगो आंदोलन हे केवळ राजकारण आहे. त्यांना आंदोलन करायचं असेल तर त्यांनी आधीच केलं असतं. त्यांना वरून परवानगी घ्यावी लागते.
आम्हाला परवानगी दिली नसती तर तेच अडचणीत आले असते. लोकांच्या भावनांच्या ताकदीसमोर त्यांनी माघार घेतली, ते झुकले आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
शिंदे-फडणवीस सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी - सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
केवळ सीमावादच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही त्यांनी अवमान केला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसंच, या मोर्चामध्ये शरद पवारही सहभागी होणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली.