बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 600 हून अधिक प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण यंत्रणा तत्परतेने मदतकार्य करीत असून प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एनडीआरएफचे 4 चमू घटनास्थळी दाखल झाल्या असून, 8 बोटींच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले गेले. नौदलाचे 7 चमू, भारतीय हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या दोन तुकड्या स्थानिक प्रशासनासह तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढच्या प्रवासासाठी 14 बसेस आणि 3 टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी कुठल्याही स्थितीत घाबरू नये. एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवाईदल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन, पोलिस अशा सर्व संस्था आपल्या मदतीसाठी आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रवाशांना आश्वस्त केले आहे.