‘हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे... हा डाग चांगला आहे...’ या शब्दात ‘डीपी’ बनवून व्हॉटस्अॅपवरचे विविध ग्रूप आणि नेटिजन मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांची सध्या रणधुमाळी शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक शहरात महापालिका हद्दीत सुमारे साडे दहा लाख मतदार असून या मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वच स्तरातून जनजगृती केली जात आहे. मतदान ही लोकशाहीची खरी ताकद असून मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे, असे अवाहन महापालिका, जिल्हा परिषद, निवडणूक आयोग, विविध सामाजिक संघटनांकडून केले जात आहे. या जागृती अभियानामध्ये सोशल मिडियाही मागे राहिला नसून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सध्या व्हॉटस्अॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सवरून ‘हा डाग चांगला आहे...’ अशी पोस्ट सध्या गाजत आहे. बहुतांश नेटीझन्सकडून ही पोस्ट ‘डीपी’म्हणून अपडेट करण्यात आली आहे.