“मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे”, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटवरुन केले आहे. महाजन यांचा कोल्हापूर-सांगलीच्या पूर पाहणी दौऱ्यातील सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. या व्हिडिओत महाजन हसत हात हलवताना दिसत असल्याने नेत्यांमधील संवेदनशीलता हरवल्याची टिका विरोधकांनी केली आहे. मात्र आता महाजन यांनी या टिकेला ट्विटवरुन उत्तर दिले आहे.
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना महाजन यांनी स्वत: एनडीआरएफ जवानांसोबत पाण्यात उतरुन लोकांना बाहेर काढण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे. “गेल्या चार दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहचलो,” असं महाजन यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे.