मोदी... आम्हाला तुमची दोन-अडीच रुपयांची भीक नको

शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (09:05 IST)
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील
 
२५ रुपयांनी पेट्रोल-डिझेलचा दर वाढवला आणि आता फार लोकं शिव्या दयायला लागल्यावर अडीच रुपये केंद्राने कमी केले. लोकं आता निवडणुकांच्या तोंडावर फिरू देणार नाही, म्हणून दोन-अडीच रुपयांची भीक जनतेला देण्याचा प्रयत्न झाला आहे. मोदी... आम्हाला तुमची अडीच रुपयांची भीक नकोय अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मोदींना ठणकावून सांगितले.
 
कल्याण-डोंबिवली शहराचा कार्यकर्ता मेळावा कल्याणमध्ये आज पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी केंद्र व राज्यसरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. शिवाय या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना सरकारविरोधी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले.
 
या मेळाव्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन करतानाच पक्षाच्या वतीने लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या संयुक्त दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून कल्याण-डोंबिवली शहरातून पहिली सुरुवात झाली. या मेळाव्यालाही कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
 
मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, आ. अप्पासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्यावेळी एमपीएससीच्या विदयार्थ्यांनी आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली आणि आपल्या काही मागण्यांचे निवेदन सादर केले.
 
याशिवाय या मेळाव्यानंतर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
 
मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांसह प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, महिला जिल्हाध्यक्षा सारीका गायकवाड आदींसह पक्षाचे युवक, युवती, विदयार्थी, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती