मुख्यमंत्री दहा वेळा आले तरीही बारामती राष्ट्रवादीचीच- धनंजय मुंडे

'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली असून महागाईचा आगडोंब या सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे  यांनी बारामती नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ रविवारी बारामती शहरातील विद्यानगरी परिसरात आयोजित प्रचारसभेत बोलताना केला.
 
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की मला संपवविण्याचे प्रयत्न सुरू असताना शरद पवार व अजितदादांनी माझ्यातील गुणांची पारख करून भटक्या समाजात जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांचा साडेतीन हजार कोटींचा घोटाळा उघड झाला असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही मुंडे यांनी या वेळी केला.
 
यावेळी मुंडे म्हणाले की नगरपालिकेची निवडणूक ही गल्लीतील निवडणूक असते. या निवडणुकीत गल्लीतील विकासाच्या धोरणावर चर्चा व्हायला हवी. मात्र, मुख्यमंत्री बारामतीत येऊन दिल्लीच्या धोरणावर बोलले, ही हास्यास्पद बाब आहे. जसे ते बारामतीत आले, तसे परळीतही आले होते, तरीदेखील परळीतील जनता राष्ट्रवादीच्याच पाठीशी राहिली. बारामतीत ते एकदा नव्हे, तर दहावेळा जरी आले तरी कोणताही फरक पडणार नाही. बारामतीची अस्मिता असणार्‍या या निवडणुकीत राष्ट्रवादीला ऐतिहासिक विजय मिळेल, असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला.
 
भ्रष्टाचारावरून रान उठवून भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, या दोन वर्षांत या सरकारमधील ११ मंत्र्यांनी साडेतीन हजार कोटींचे घोटाळे केले. ते आपण पुराव्यानिशी सभागृहात सादर करूनही मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप मुंडे यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा