तुमचे फटाके प्राणी, पक्षांच्या जीवावर तर उठत नाही ना?

शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (09:59 IST)
शाळांमध्ये “फटाकेमुक्‍त दिवाळी’च्या कितीही शपथा घेतल्या, तरीही अनेक विद्यार्थी फटाके आणतात आणि पालकही त्यांना ते पुरवतात. मात्र, तुमचे हे फटाके अनेक प्राणी व पक्षांच्या जीवावर उठत तर नाही ना? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन वनविभाग व अग्निशामक दलाने यंदाही केले आहे.
 
गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक दिवाळीचे आवाहन सातत्याने केले जात असले, तरीही फटक्‍यांचा धूर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. याचा मोठा परिणाम माणसांबरोबरच प्राणी व पक्षांवर होतो. फटाक्‍यांच्या आगीमुळे अनेक प्राणी जखमी होत असल्याचे वनविभागाने सांगितले. तर अनेक प्राणी व पक्षांना या काळात श्‍वसनाचे आजार होतात. हे आजार दीर्घकाळ परिणाम करणारे असतात. फटाक्‍यांचा आवाजामुळे अनेक प्राणी, पक्षी, कीटक यांच्यावर मोठा परिणाम होत असल्याचे पर्यावरण अभ्यासक व बायोस्फियर संस्थेचे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले.
 
याबाबत अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, दिवाळीच्या दिवसांत सर्वांत जास्त आगी या फटाक्‍यांमुळेच लागतात. पेटती फुलबाजी फेकणे, भुईचक्र लाथाडणे, टेरेसवर व गॅलरीत फटाके पडणे, डबा झाकून फटाके वाजविणे यामुळे आगीचे प्रकार घडतात. यामुळे माणसांबरोबर आजुबाजुच्या प्राण्यापक्ष्यांनाही धोका निर्माण होतो. लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत दरवर्षी शहरात साधारण 200 आगीच्या घटना घडतात. यांना जर आवर घालायचा असेल, तर चुकीच्या पध्दतीने व काही चुकीचे फटाके उडविणे बंद करणे गरजेचे आहे.
 
दिवाळीतील फटाक्‍यांमुळे अनेक पक्षी व प्राणी जखमी होतात. जंगलांना आगी लागण्याच्याही घटना घडतात. गवत वाळलेले असेल, तर हा वनवा खूप पसरतो. पुणे शहरात अनेक प्रकारचे पक्षी एरव्ही दिसतात. मात्र दिवाळीच्या काळात हे पक्षी अचानक गायब होतात. या फटाक्‍यांच्या आवाजामुळे या पक्षांना मोठा त्रास होतो. तसेच धुरामुळे श्‍वसनाचे त्रासही प्राण्यांना होतात. त्यामुळेच सर्वांनीच पर्यावरणाचा सांभाळ करत फटाक्‍यांशिवाय दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे.
– एम. पी. भावसार, सहवनसंरक्षक, पुणे वनविभाग

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती