शिवभोजन थाळी योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:58 IST)
ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख ‘अन्नपूर्णेची थाळी’ म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत ३ कोटी ५ लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
 
हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसूत्रीत ‘भुकेलेल्यांना अन्न’ हे एक सूत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोंची नाही तर कोट्यवधी लोकांची भूक भागविण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्रचालक यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत ९०५ केंद्र सुरु झाले असून योजनेवर आतापर्यंत ८६.१० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
 
सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च २०२० पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात ४५ तर ग्रामीण भागात ३० रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी ‘शिवभोजन’ ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे.
 
टाळेबंदीच्या काळात मजूर, स्थलांतरीत लोक, राज्यातच पण बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने फक्त ५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूक भागवण्याचे काम केले. चपाती, भाजी, वरण भाताचं जेवण असणारी ही थाळी आज अनेक गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती