मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूमध्ये निर्माण झालेली कर्करोगाची गाठ रूग्ण महिलेच्या जागेपणीच शस्त्रक्रिया करून काढण्याची किमया केली. शस्त्रक्रियेनंतर महिला रूग्ण पूर्णपणे ठीक असून या यशस्वी कामगिरीबद्दल शासकीय रूग्णालयातील भूलतज्ञ व मेंदूविकार तज्ञांसह कर्मचारी पथकाचे अभिनंदन होत आहे.
काही दिवसापुर्वी चक्कर येणे व डोकेदुखीचा त्रास असल्याची ४० वर्षाच्या रूग्ण महिलेची तक्रार होती. या तक्रारीवरून कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीमध्ये तिच्या मेंदूमध्ये कर्करोगाची (ग्लिओमा) गाठ असल्याचे आढळून आले. अधिक वैद्यकीय तपासणीमध्ये मेंदूच्या उजव्या बाजूच्या भागात २,४ बाय २.८ बाय ३.४ सेंटीमीटरची गाठ असल्याचे निदान झाले.
मेंदूला झालेली गाठ काढण्यासाठी पूर्ण भूल दिली तर मेंदूच्या अन्य भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मेंदू विकार शल्यविशारद आणि भूलतज्ञ यांनी रूग्णाला जागे ठेवूनच मात्र, स्थानिय भूल देउन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामागचा उद्देश म्हणजे मेंदूच्या चांगल्या भागाला धक्का न लागता गाठ काढता यावी व शस्त्रक्रियेतील गुंतागुंत टाळता यावी जसे झटके/आकडी येणे, अर्धांगवायूचा झटका इत्यादी. कवटीच्या वरील त्वचा व मेंदूचे आवरण हे अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे कवटीवरील त्वचेला दोन्ही बाजूने पाच ठिकाणी भूलतज्ञांनी स्थानिय भूल दिली. जेणेकरून शस्त्रक्रियेच्या ठिकाणचा भाग पूर्णत बधीर झाला व शस्त्रक्रिया करण्यात आली.
रूग्णाची कवटी उघडल्यानंतर भूलतज्ञांच्या सूचनेनुसार न्यूरोसर्जनने मेंदूच्या आवरणाभोवतीचा भाग बधीर केला. शस्त्रक्रिया चालू असताना रुग्ण झोपी जावा व उठल्यावर तात्काळ जागा व्हावा अशा पद्धतीची गुंगीची औषधे शिरेवाटे देण्यात आली. रुग्णावरील शस्त्रकिया सुमारे 4 तास चालली. संपूर्ण शस्त्रक्रिया दरम्यान रुग्ण जागा होता व वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देत होता.