राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:44 IST)
अभिमान गीताच्या पत्रकातून सातवं कडवं गायब ...दादांनी व्यक्त केली नाराजी...
आज विधान सभेत मराठी भाषा दिन साजरा करत असताना गाण्यात येत असलेल्या मराठी अभिमान गीतातून सातवे कडवे वगळण्यात आले होते. ही बाब विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तर अभिमान गीत सुरु असतानाच माईक बंद पडल्याची बाब लक्षात आणून देतानाच अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करत आहे का? हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले होते आणि त्यातून कोणाला काय मिळतंय याची चौकशी करा अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.
अजित पवार यांनी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा. कारण काही मुलांना मराठी नीट वाचता किंवा लिहिता येत नाही. मला कुणाचा अपमान करायचा नाही परंतु सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही याबाबत नाराजी व्यक्त करतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल असेही अजित पवार म्हणाले.
मराठी भाषा विषयक ठरावावर बोलताना अजित पवार यांनी ही मागणी लावून धरली. दरम्यान मराठी भाषा विषयक ठराव मांडत असतानाच विनोद तावडे यांचे सभागृहामध्ये आगमन झाले, त्यांच्या उशीरा येण्यावरही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार – जयंत पाटील यांचा सवाल
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन सभागृहात गोंधळ...वेलमध्ये उतरत विरोधकांचे आंदोलन...काही काळासाठी सभागृह तहकूब