अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

सोमवार, 5 एप्रिल 2021 (23:31 IST)
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.
 
आज (5 एप्रिल) उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.
 
त्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा आणि गृहविभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं .
 
राज्यपालांनी या पत्राचा स्वीकार करत गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास मंजुरी दिली आहे.
 
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिलीय.
 
दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेते मानले जातात. शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या संबंधांबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितलं, "दिलीप वळसे-पाटील यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हे अतिशय जुने आणि जवळचे आहेत. दिलीप वळसे-पाटील यांचे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील हे स्वतः आमदार होते आणि शरद पवारांचे समर्थक होते.
 
त्यांनी आपला मुलगा राजकारणात तयार व्हावा म्हणून दिलीप वळसे-पाटील यांना शरद पवारांकडे पाठवलं. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं. त्यांची क्षमता ओळखून शरद पवारांनी त्यांना राजकारणात पुढे आणलं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती