वागळे इस्टेट भागातील आशिष दुबे या ठाण्यातील उच्चशिक्षित तरुणाचे थायलंडमध्ये तीन हजार डॉलरच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे. त्याची थायलंडच्या दूतावासाशी बोलून सुटका करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आशिषच्या पालकांनी केली. दरम्यान, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असून ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आशिषचा भाऊ अविनाश दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आशिष हा २० सप्टेंबरला एका मित्राच्या ओळखीतून थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये नोकरीसाठी गेला होता. तिथे चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमधील संबंधित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला. त्याला जंगलातून नदी ओलांडून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यासारख्याच भारतातील १३ तरुणांना ठेवण्यात आले होते.