जळगावचे 2 विद्यार्थी रशियातल्या नदीत गेले वाहून; व्हीडिओ कॉलवर आईशी बोलणं झालं आणि..
शुक्रवार, 7 जून 2024 (20:10 IST)
अंमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील एमबीबीएसचे 2 विद्यार्थी रशिया येथील नोवगोरोड च्या नदीत वाहून गेल्यानं बेपत्ता झाले. या दोघांशिवाय आणखी तीन जण वाहून गेले होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
4 जून रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्लामपुरा भागातील 20 वर्षीय जिशान अशपाक पिंजारी व त्याच्या आत्याची मुलगी 20 वर्षीय जिया फिरोज पिंजारी अशी बेपत्ता असलेल्या दोघांची नावं आहेत.
अशपाक मुनीर पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलकी नोवगोरोड शहरात पाठवले होते.
4 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास जिशान, जिया आणि भडगाव येथील हर्षल संजय देसले, मुंबई येथील गुलाम गोस मलिक हे चार विद्यार्थी शहरातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते.
नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई, शमीम ला व्हीडिओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. अन जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय? लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले की, "बेटा तू पाणी मे मत जा, और जिया को भी बाहर निकाल और जलदी घरपे पहुचो ..."
आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत, त्याने लगेच व्हाट्सअप वर संदेश टाकला की आम्ही घरी जातो. अवघ्या 15 मिनिटात नदीला पूर आला अन क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले.
उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले, परंतु जिशान आणि जिया यांचा सापडले नाहीत. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अशपाक पिंजारी यांच्या तेथील नातेवाईकांनी ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यामुळे रात्री सव्वा अकराच्या सुमारास झालेला व्हीडिओ कॉल शेवटचा ठरला होता.
रशिया येथे तेथील डॉक्टर दिनेश हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेथील यंत्रणा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कुटुंबीयांच्या घरी पाठवले. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग येथील दुतावासातील राजदूत डी. डी. दास यांचा फोननंबर दिला.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये अशा सूचना दिल्या.राजदूत डी. डी. दास यांनी देखील पिंजारी कुटुंबीयांना योग्य त्या मदतीचे आश्वासन देऊन संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.
जिशान आणी जिया हे दोन्हीही सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अशपाक पिंजारी यांनी मुलगा व भाची दोघांना शिक्षणासाठी पाठवले होते. जिशानला एक बहीण आहे तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी हे हळदीची शेती करतात.
अशपाक पिंजारी यांनी नुकतेच दोघांना परत भारतात सुटीवर येण्यासाठी पैसे पाठवले होते. पुढील महिण्यात 23 जुलै रोजी त्यांनी विमानाचं बुकिंग करून ठेवलं होतं.