मुंबई सीमा शुल्क विभागाकडून नवी मुंबईतल्या तळोजा इथल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट केंद्रात १४० किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. त्यामध्ये विमानतळ प्राधिकरण, एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडून ताब्यात घेतलेल्या अंमली पदार्थांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेवेळी सीमा शुल्क विभागाच्या परिमंडळ तीनचे मुख्य आयुक्त राजेश सनन उपस्थित होते.
अंमली पदार्थांची भारतात होणारी तस्करी रोखण्यासाठी मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधी शाखेचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आली असून तिथं संपूर्ण भारतात अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची एकत्रित माहिती संकलित केली जाणार आहे. काही विशिष्ट विमानसेवा कंपन्या आणि विमानतळ इथून प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास पाहून विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती विमानतळ सीमा शुल्क विभागाचे सह आयुक्त धनंजय माळी यांनी पत्रकारांना दिली.