शिर्डी- स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादात आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणुका घ्याव्यात; जेणेकरून जनतेला काय हवे आहे याचा निर्णय होईल, असे सांगत विखे-पाटलांनी भाजपवर पलटवार केला आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिर्डीत केले होते. त्याला विखे-पाटलांनी उत्तर दिले आहे.
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकार स्वत:चे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विखे-पाटलांनी केली. सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरल्याने राज्य सरकारकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यावर विदर्भातील सर्व आमदार आणि खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि नव्याने निवडणुका घेऊ याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही विखे-पाटील म्हणाले.