सेवाग्राम विकास आराखडयास प्रशासकीय मान्यता/
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपुर्ण निर्णय
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्हयातील सेवाग्राम आश्रम परिसरात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रू. 144.9975 कोटी किमतीच्या सेवाग्राम विकास आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. शासनाच्या नियोजन विभागाने दि. 1 ऑक्टोबर 2016 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत केला आहे.
महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्हयातील सेवाग्राम आश्रम परिसरात पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडयात प्रशासकीय मान्यता देण्याची तसेच गांधी फॉर टुमारो-महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र या प्रकल्पाला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. सेवाग्राम विकास आराखडयाकरीता नियोजन विभागाच्या दि. 15.09.2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीने मान्यता दिली आहे. सदर समितीच्या दि. 17.11.2015 रोजी झालेल्या बैठकीत प्रस्तावित रूपये 266.5375 कोटीच्या सेवाग्राम विकास आराखडयास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने दि. 26.02.2016 च्या बैठकीत सदर आराखडयाच्या छाननी करून मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या दि. 07.07.2016 रोजीच्या बैठकीत सदर आराखडयातील कामांचे सादरीकरण करण्यात आले होते.
सेवाग्राम विकास आराखडयासंदर्भात जिल्हाधिकारी वर्धा यांनी सादर केलेल्या रू. 144.9975 कोटी किंमतीच्या आरखडयातील प्रस्तावित कामाना नियोजन विभागाच्या दि. 1 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयान्वय देण्यात आली आहे. गांधी फॉर टुमारो-महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र या प्रकल्पाला स्वतंत्रपणे मान्यता देण्यात येईल असेही शासन निर्णयात नमुद केले आहे. दि. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती असल्याने 1 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करून सेवाग्राम विकास आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याचा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय महत्वपुर्ण मानला जात आहे.
नुकतीच 22 सप्टेबर रोजी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली व केंद्रीय पर्यटन व सांस्कृतीक कार्य राज्य मंत्री महेश शर्मा यांची भेट घेवुन सेवाग्राम विकास आराखडयासाठी प्रस्तावित 266.5375 कोटी रू. निधी पैकी दोन तृतीयांश निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.