कोल्हापूर- मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, संभाजीराजेंची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले आहे. शनिवारी पवार यांनी केलेल्या मिश्कील टिपणीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबत पवारांना विचारणा केली, त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची गरज नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखलाही त्यांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झाली, असेही मिश्किलपणे ते म्हणाले. पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असे पवार म्हणाले. त्यामुळे पवारांचे हे विधान मिश्किल असले तरी त्याची खमंग चर्चा झाली होती.