राज्यात गणरायाचे आगमन होताच वरुणराजानेही विविध ठिकाणी दमदार हजेरी लावत सुखद धक्का दिला आहे. दुष्काळी मराठवाडय़ातील काही भागासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आगामी दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात 84.5 मिमी पाऊस पडला. अजूनही औरंगाबाद आणि परिसरात पाऊस सुरू आहे. बीड, जालनामध्येही पावसाची संततधार सुरू आहे. कालपासून बरसत असलेल्या पावसाने दुष्काळी मराठवाडय़ात दिलासा दिला आहे. अजूनही मराठवाडय़ात पावसाचा जोर आहे. पावसाने ओढ दिलेल्या मराठवाडय़ाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातही आता पावसाने जोर पकडला आहे.
पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत
शुक्रवारच्या दिवसभराच्या जोरदार पावसामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे आणि जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलदगती मार्गावर मोठय़ा प्रमाणवर पाणी वाहून आले. त्यामुळे वाहतूक थांबवणे गरजेचे झाले. त्याचप्रमाणे रेल्वे रुळाचा खालचा भाग खचला. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.