कामावरून काढल्याने मालकिणीला पेटवले,दोघांचा मृत्यू

बुधवार, 27 एप्रिल 2022 (10:39 IST)
टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचा राग आल्यावर त्याने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी येथे घडला आहे. या घटनेत मालकिणीसह कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. बाला जॉनी(32) आणि मिलिंद नाथसागर वय वर्षे 35 यांचा मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या प्रशांत कुमार नावाचा तरुण भाजल्याने जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. मयत महिला बाला ही मूळची ओरीसाची रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला ती आपल्या 10  वर्षाच्या मुलासह राहत होती. ती गेल्या 10 वर्षांपासून वडगाव शेरी परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करत होती. तर मिलिंद हा परभणी चा होता. चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मयत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
या प्रकरणी अधिक माहिती अशी मिळाली आहे की , वडगाव शेरी परिसरात बाला जॉनी या महिलेचे टेलरिंगचे दुकान आहे. गेल्या दोन वर्षांपासून मिलिंद हा त्यांच्या कडे काम करत असे. काही दिवसांपूर्वी मयत महिलेने मिलिंदला कामावरून काढले होते. त्याच राग मिलिंदच्या डोक्यात होताच. त्याने रागाच्या भरात येऊन सोमवारी रात्री मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत मिलिंद आणि बाला हे दोघे जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेतच स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा मृत्यू  झाला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती