कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

शनिवार, 10 जुलै 2021 (08:42 IST)
कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच गेले पाहिजेत.नियमभंग करणाऱ्‍यां विरुद्ध प्रशासकीय यंत्रणांनी अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्‍यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्‍यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे,खासदार गिरीष बापट, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनिल शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आ. अतुल बेणके, आ.सुनिल कांबळे,आ. दिलीप मोहिते, आ.राहुल कुल तसेच यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे, टास्क फोर्सचे डॉ. दिलीप कदम आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
पुणे जिल्ह्याने कोविड लसिकरणाचा पन्नास लाखाचा टप्पा पार केला याबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे. निष्कारण घराबाहेर पडणाऱ्‍या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलीस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. 

पुणे जिल्ह्यात मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबतही दक्षता घ्यावीच लागणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
 

पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश
 
जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाबाबच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीष बापट, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनिल शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे,आ.अतुल बेणके,आ.सुनिल कांबळे,आ. दिलीप मोहिते,आ.राहुल कुल यांनीही महत्त्वाचे विषय मांडले.डॉ.सुभाष साळुंके म्हणाले, लसीकरणाचा वेग वाढविण्यासोबतच कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन केले पाहिजे.
 
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन,लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत लहान मुलांसाठीचे नियोजन याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
 
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
 
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती