उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथीदारांवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

शुक्रवार, 30 जुलै 2021 (15:55 IST)
औंध परिसरातील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या चार साथीदारांवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्जाची रक्कम परत केलेली असतानाही लाखो रुपये मागून त्यापोटी घर नावावर करण्यासाठी बळजबरीने वकिलाच्या कार्यालयात नेऊन सह्या घेतल्या बाबत खंडणी,अपहरण,धमकी तसेच महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नानासाहेब शंकर गायकवाड,केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा.औंध,पुणे),सचिन गोविंद वाळके (रा.विधातेवस्ती, बाणेर),राजू दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख),संदीप गोविंद वाळके (रा.विधाते वस्ती, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत महेश पोपट काटे (वय 39, रा. पिंपळे सौदागर) यांनी शुक्रवारी (दि. 30) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
ही घटना 13 सप्टेंबर 2017 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत महेश काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील घरी आणि बाणेर येथे घडली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे यांनी आरोपी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे काटे यांनी परत केले होते.तरीही आणखी 80 ते 85 लाख रुपये काटे यांच्याकडे आहेत, ते परत करण्याची तजवीज कर. नाहीतर पिंपळे सौदागर येथील जमीन व घर आरोपीच्या नावावर करून दे,असे म्हणून आरोपींनी वेळोवेळी धमकी दिली.
 
तसेच काटे यांना त्यांच्या घरातून कागदपत्रासह सचिन वाळके, संदीप वाळके यांनी आणलेल्या फॉर्च्यूनर कारमधून बळजबरीने बसवून अॅड.चंद्रकांत नाणेकर यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे काटे यांना शिवीगाळ करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करून आरोपींनी बनवलेल्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या.
 
या घटनेमुळे फिर्यादी काटे घाबरले होते. त्यामुळे त्यांनी आठ महिन्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 364 अ, 365,386,452,506 (2),143,147,149,महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 कलम 39,क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
 
नानासाहेब गायकवाड आणि साथीदारांवर आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात सांगवी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती