अतिरेक्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेले मुंबईतील ताज हॉटेल पार उध्वस्त झाले आहे. हे हॉटेल म्हणजे मुंबईची एक ओळख आहे. हे हॉटेल पाहिल्याशिवाय आणि त्याच्यासमोर फोटो काढल्याशिवाय पर्यटकही जात नाहीत. परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात याच हॉटेलमध्ये उतरतात. टाटा ग्रुपमधील या हॉटेलच्या निर्मितीमागेही मोठा इतिहास आहे. टाटा हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस या साखळीतील मूळ हॉटेल हे आहे.
जमशेदही नुसवानजी टाटा यांनी या हॉटेलची स्थापना केली ती खरे तर सूडापोटी. ब्रिटिश काळात वॉटसन हे एक पॉश हॉटेल होते. तिथे फक्त गोर्यांनाच प्रवेश असायचा. टाटा गर्भश्रीमंत. तरीही त्यांना या हॉटेलमध्ये प्रवेश दिला गेला नाही. या अपमानाचा बदला म्हणून त्याला तोडीसतोड हॉटेल त्यांनी बांधले. तेच हे ताज हॉटेल. १६ डिसेंबर १९०३ रोजी हे हॉटेल सुरू झाले.
टाटांनी हे हॉटेलही अगदी आलिशान असे बांधले. त्यासाठी लंडन, पॅरीस, बर्लिन आणि डसेलडर्फ येथे जाऊन कलात्मक वस्तू, फर्निचर आणले. युरोपीय, रोमन संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी हे हॉटेल सजविण्यासाठी आणल्या आणि हे दिमाखदार हॉटेल उभे राहिले.