लज्जतदार ब्लॉग

PRPR
ब्लॉग कॉर्नर या सदरात गेल्या दोन आठवड्यात आपण संगणक जगत आणि मराठी साहित्य या दोन ब्लॉगविषयी माहिती वाचली. या आठवड्यात आम्ही तुमच्यासाठी अगदी वेगळ्या प्रकाराचा ब्लॉग घेऊन आलोय.

तुम्हाला जवसाची चटणी, लाल ढब्बू मिरचीचे सूप, मोडाण्याची भेळ, अक्की रोटी, व्हर्जिन पीन कोलाडा, टोफू टिक्का मसाला हे पदार्थ कसे करायचेत हे माहिती आहे? नाही ना. खाद्यपदार्थांची रेसिपी दिलेल्या पुस्तकातही या पदार्थांची माहिती एकत्रित मिळणार नाही. पण इंटरनेटवर भटकंती करत असाल तर 'वदनी कवळ घेता' हा ब्लॉग चुकवू नका. या पदार्थांची माहिती तर येथे मिळेलच, पण त्याशिवायही इतर पदार्थांचा शब्दास्वाद येथे घेता येईल. वास्तविक खाण्याच्या पदार्थांवर ब्लॉग सुरू करता येईल ही कल्पनाच अफलातून. पण या ब्लॉगकर्त्याने ती प्रत्यक्षात उतरवून नेटीझन्सना खमंग भेट दिली आहे. वाचता वाचताच तोंडाला जाम पाणी सुटते.

ब्लॉगकर्त्याने आपले मूळ नाव दिलेले नाही. पण 'मिंट' या उपनामाने हा ब्लॉग चालवला जातो. मूळची पश्चिम महाराष्ट्रातील मिंट आता नोकरीनिमित्त अमेरिकेत असते. अर्थातच सॉफ्टवेअर तंत्रज्ञानात ती काम करते. याच वर्षी अठरा मार्च २००७ ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ब्लॉगची सुरवात तिने केली आणि त्याचा दरवळही लवकरच सर्वत्र पोहोचला. त्यामुळे अल्पावधीतच ब्लॉग लोकप्रियसुद्धा झाला.

या ब्लॉगमध्ये काय नाही? उघडल्यानंतर जीभ नुसती चाळवायला लागते. मिंटला खाण्याची आणि खिलवण्याची चांगलीच आवड दिसतेय. त्यामुळे सगळ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तिने पाककृती दिल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला न्याहरीसाठी पदार्थ करायचे की जेवणासाठी? दोन्ही प्रकारचे पदार्थ येथे आहेत. शिवाय जेवणाच्या आधी असणाऱ्या एपेटाझरची कृतीही वाचायला मिळते. विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी येथे आहेत. विविध प्रकारची पेये, रोज करता येण्यासारखे पदार्थ, पार्टीसाठीचे पदार्थ, झटपट होणारे पदार्थ, कॉकटेल फूड असे शेकडो पदार्थ येथे आहेत. जिभा चाळवणार्‍या पदार्थांशिवाय ज्यामुळे आपले पोषण चांगले होईल, असे पौष्टिक पदार्थ कसे बनवावेत हेही येथे वाचायला मिळते.

महत्त्वाचे म्हणजे प्रांतनिहाय खाद्यपदार्थही आपल्याला कसे करायचे याची माहिती मिळते. खानदेशात प्रसिद्ध असलेले वांग्याचे भरीत, कर्नाटकातील अक्की रोटी, ढब्बू मिरचीची मसालेदार भाजी या पदार्थांच्या कृती वाचायला मिळाल्यानंतर आपोआपच त्यांची चव घेण्याची इच्छाही 'जिभेवर' दाटून येते.

रोजच्या पदार्थ या सदरात तब्बल तेवीस पाककृती आहेत. यात फोडणीचे वरण, शेपूची भाजी, डाळ मेथी, डाळ कांदा अशा ओळखीच्या पदार्थांव्यतिरिक्त मूगाचा डोसा, लाल ढबू मिरचीचे सूप, सोयाबिन व गाजराची भाजी, पालकाची कोशिंबीर हे थोडेसे हटके पदार्थही आहेत.पौष्टिक पदार्थांत झटपट मटकी, खजूर रोल्स, टोफू टिक्का मसाला, कैरीची डाळ, कोबीची कोशिंबीर असले फारसे ऐकिवात नसलेले पदार्थ 'चाखायला' मिळतात.

मिंटच्या या खाद्ययात्रेत गोड पदार्थही आहेत. साखरांबा, शेवयाची खीर, पंचखाद्य या नेहमीच्या पदार्थांबरोबरच सात कप बर्फी कशी बनवावी याचीही कृती आहेत. विविध पेयांच्या कृतीही मिंटने दिल्या आहेत.

घरी जावे आणि फ्रिझ उघडून पहावा आणि कोणतीही भाजी शिल्लक नसावी. बाहेर जाऊन काही आणण्याची इच्छा नसावी आणि भूकही लागलेली असावी. अशाच एकदा भुकेपोटी लागलेला 'लज्जतदार पराठ्यांचा' शोधही येथे आहे.

या पदार्थांबरोबरच त्याच्या टिप्सही मिंटने दिल्या आहेत. उदा. लाल ढबू मिरचीच्या सुपाची कृती सांगताना हिरवी ढबू मिरची वापरून हा पदार्थ करू नये असा 'इशारा'ही ती देते. खुसखुशीत शब्दांत दिलेल्या काही टिप्सने ब्लॉगची लज्जत वाढवली आहे. हिरव्या मिरचीचा खर्डा हा एक अस्सल कोल्हापूर, सातारा भागातला पदार्थ करताना आणि खाताना स्वत:च्या जबाबदारीवर करावा/खावा ही सावधगिरीची सूचनाही ती देते. ''कोल्हापुरी मिसळ - माझ्या पद्ध्तीने! हॉटेलवाले घालतात तेवढे तेल, आणि तिखट आणि मसाला वापरुन जर मी कुणाला करुन घातली तर मला लोक वाळीतच टाकतील!!!'' ही कॉमेंट त्या मिसळ इतकीच झणझणीत आहे.

या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे पदार्थांबरोबर मिंटचे असलेले नातेही तिने अतिशय अल्पशब्दात तितक्याच खमंगपणे मांडले आहे. उदाहरणार्थ बटाटेवड्याची कृती देताना कराडच्या दिवेकरांच्या बटाटेवड्याची आलेली आठवण, लहानपणापासून आवडणारं फोडणीचं वरण शेवयांच्या खिरीसंदर्भात परवीनमावशीकडून येणारा शीरखुर्म्याचा डबा अशा अनेक आठवणी पदार्थांसोबत येऊन त्याची लज्जत वाढवतात.

या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या ब्लॉगला नक्की भेट दिली पाहिजे.

ब्लॉगचे नाव- वदनी कवळ घेता
ब्लॉगचा पत्ता- http://vadanikavalgheta.blogspot.com/
ब्लॉगर- मिंट

दर्जेदार मराठी साहित्याचा आस्वाद

वेबदुनिया वर वाचा