दिल्लीत UPSC ची तयारी करणाऱ्या मराठी मुलीने आपलं जीवन का संपवलं?

बुधवार, 31 जुलै 2024 (09:26 IST)
दिल्लीत स्पर्धा परीक्षेची (UPSC) तयारी करण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
 
अंजली गोपनारायण असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ती मूळची महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील आहे.
 
21 जुलै 2024 च्या रात्री साडेआठच्या सुमारास अंजलीनं दिल्लीतल्या ओल्ड राजेंद्र नगर येथे भाड्यानं राहत असलेल्या घरी आत्महत्या केली.
 
अंजली ही मूळ अकोला जिल्ह्यातल्या अकोला शहरातली आहे. ‘बार्टी’ची (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) शिष्यवृत्ती अंजलीला मिळाली होती. त्याआधारेच अंजली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथे आली होती.
 
16 जून 2024 रोजी यूपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली. दोन आठवड्यात या परीक्षेचा निकाल हाती आला. या परीक्षेत अंजलीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानं ती नाराज होती. त्यात तिच्या घरमालकानेही राहत्या घराचं भाडं अडीच हजारांनी वाढवून 15 हजार 500 रुपयांवरून 18 हजार केलं.
 
घरभाडं वाढल्यानंही अंजली काहीशी तणावात होती. त्यात शिष्यवृत्तीही संपल्यानं तिच्या तणावात आणखी भर पडली. हा तणाव तिला सहन झाला नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं, असं सांगण्यात येत आहे.
 
आत्महत्येपूर्वी अंजलीने सुसाईड नोट लिहिली, ज्यात तिने मानसिक तणावासह एका अनोळखी शहरात राहत असताना, ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याचाही उल्लेख केलाय.
 
तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, 'मी खूप प्रयत्न केला पण या नैराश्यातून बाहेर येण्याऐवजी ते आणखी भयंकर होत चाललयं. मी डॉक्टरकडेही गेले होते, पण माझे मानसिक आरोग्य सुधारत नाहीये. पीजी आणि वसतीगृहाचं भाडं कमी व्हायला हवं. ही लोकं विद्यार्थ्यांचे पैसे लुटत आहेत, आणि प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नाही. हे सगळं आता सहनशीलतेपलिकडे गेलंय, आणि आता बास झालं.'
 
अंजलीनं आपल्या मृत्यूपश्चात अवयवदान करण्यात यावं, अशी विनंतीही सुसाईड नोटमधून कुटुंबीयांकडे केलीय.
 
अंजलीचे कुटुंबीय काय म्हणाले?
अंजलीचे वडील अनिल लक्ष्मण गोपनारायण हे अकोला पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
 
अंजली तिच्या भावंडांमध्ये वयानं मोठी होती. तिला लहान भाऊ आहे.
 
अंजलीचे वडील अनिल गोपनारायण यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले, “बीएससी ॲग्रीनंतर UPSC च्या तयारीसाठी दोन वर्षांपूर्वी ती दिल्लीला गेली. गेल्या सात-आठ महिन्यांपासून ती ओल्ड राजेंद्र नगर भागात एका पेइंग गेस्ट होममध्ये राहत होती. तिने घरभाडेवाढीबाबत आईला फोनवर सांगितलं होतं. नवीन घराच्या शोधात असल्याचंही तिनं सांगितलं होतं."
 
"आम्ही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय, अंजलीच्या आईने मोठा धसका घेतलाय," असंही अनिल गोपनारायण यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले की, “माझी पोरांना विनंती आहे की, यश अपयश येतंच असतं, मुलांनी पेशन्स बाळगावा. आपल्या मेहनतीचं यश आज उद्या, कधी न कधी मिळतंच, पण खचून न जाता प्रयत्न करत राहावं. धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे ताणतणाव येतोच, पण हे असं टोकाचं पाऊल उचलू नये.”
 
"ओल्ड राजेंद्रनगरमध्ये दुरुन पोरं शिकायला येतात. मात्र, तेथे शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. त्याची झळ पोरांना सोसावी लागते. तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रकरणही आता समोर आलंय. याबाबत आम्ही सामूहिकरित्या पावलं उचलून न्यायासाठी मागणी करणार आहोत," अशीही माहिती अंजलीच्या वडिलांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
22 जुलै 2024 रोजी ओल्ड राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दिल्लीतल्याच राममनोहर लोहिया (RML) रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया करून, अंजलीचं पार्थिव तिचे वडील अनिल गोपनारायण आणि मामा अमर पाटोडे यांनी दिल्लीहून नागपूरला आणलं. त्यानंतर रुग्णवाहिकेनं अकोल्याला नेण्यात आलं.
 
अंजलीच्या मित्रपरिवारातील विशाल शिंदे यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.
 
विशाल शिंदे यांनी सांगितलं की, “पूर्वपरीक्षेच्या एक दिवसाआधी तिला राहत असलेल्या घराचं भाडं अडीच ते तीन हजारांनी वाढवण्यात आल्याचं कळालं. तिने घरमालकांना भाडेवाढ न करण्याबाबत विनंती केली. पण त्यास नकार मिळाला. वाढीव भाडं द्यावं अथवा घर खाली करा, असं तिला घरमालकाकडून उत्तर मिळालं. यानंतर तिने घर खाली करण्याबाबत होकार दिला. मात्र, परीक्षेचा ताण, त्यात घर खाली करण्याचा दबाव, यामुळे ती तणावात होती.”
 
तीन विद्यार्थ्यांचा लायब्ररीत मृत्यू
अंजलीच्या आत्महत्येच्या घटनेच्या आठवड्याभरानं याच भागात पावसाचं पाणी लायब्ररीत शिरल्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं दिल्लीतल्या या भागातल्या सोयीसुविधांच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
 
27 जुलैला UPSC कोचिंग इंस्टिट्यूटमधील इमारतीच्या तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर ओल्ड राजेंद्र नगर परिसरातील संतप्त विद्यार्थी आंदोलन करत न्याय मागत आहेत. या भागातील जवळपास 13 सेंटरवर कारवाई करण्यात आलीय.
 
दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलंय. देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी इथे परीक्षेच्या तयारीसाठी येतात. मात्र, येथे विद्यार्थ्यांच्या राहण्या-खाण्याची नीट व्यवस्था नाही, सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन नाही, नियमितपणे साफ-सफाई देखील केली जात नाही, अशा तक्रारी इथल्या विद्यार्थ्यांच्या आहेत.
 
हा परिसर विजेच्या तारांनी भरून गेलाय, त्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोकाही असतो. नुकतीच तळघरातील लायब्ररीत घडलेली दुर्घटना याच प्रकारातील होती.
 
आपली स्वप्नं साकार करून देशसेवेत हातभार लावण्याच्या उद्देशानं अनेक विद्यार्थी यूपीएसससीसह इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घरापासून दूर दिल्लीत येतात. पण इथले सोयीसुविधांचा अभाव आणि त्यात परीक्षांचा तणाव हे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती