गौतम अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेला पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल

गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (20:24 IST)
गौतम अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आलेला पैसा कुणाचा आहे? हा पैसा प्रथम भारतातून बाहेर गेला. अदानी यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवण्याच्या हेतूने हाच पैसा पुन्हा भारतात आणला गेला. या संपूर्ण प्रकरणात काहीतरी चुकीचं सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
 
आज (31 ऑगस्ट) राहुल गांधी हे INDIA बैठकीसाठी मुंबई येथे दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी राहुल गांधी म्हणाले, “G-20 हे भारताच्या जगातील स्थानाबाबत आहे. पण,जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी भारतासारख्या देशाने पारदर्शकता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.”
 
ते म्हणाले, “आजच एका वृत्तपत्रात एक बातमी आली. त्यामध्ये अदानी ग्रुपने आपल्याच कंपनीत गुप्तपणे काही गुंतवणूक केली आहे का, असा प्रश्न या बातमीतून विचारण्यात आला आहे. कोट्यवधी पैसा भारतातून बाहेर गेला. तिथून फिरवून तो परत भारतात परत आणला गेला. हा कुणाचा पैसा आहे, हा पहिला प्रश्न आहे.”
 
“दुसरा प्रश्न म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंट विनोद अदानी हा आहे. तो गौतम अदानी यांचा भाऊ आहे. त्यासह नासर अली शबान अली, चीनची एक व्यक्ती आहे चँग चिंग लिंग. या सर्वांची यामध्ये काय भूमिका आहे, हे स्पष्ट व्हायला हवं,” असंही त्यांनी म्हटलं.
 
या संपूर्ण प्रकरणात काहीतरी चुकीचं सुरू आहे. आपण एक पारदर्शक अर्थव्यवस्था आहोत, असं दाखवण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचा एक उद्योगपती आपल्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करतो.
 
तो पैसा विमानतळ, बंदरे अशा व्यवसायांमध्ये वळवतो. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) बनवण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
 
सोनिया गांधी, राहुल गांधी मुंबईत
इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले.
 
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा सामना करण्यासाठी INDIA ही विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यात आली आहे.
 
या आघाडीची बैठक मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरातील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीस 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
 
पटना आणि बेंगळुरूनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक मुंबईत होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही बैठक महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 
मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) हे करत आहेत.
 
या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी काल (30 ऑगस्ट) शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.
 
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. तसंच, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तसेच शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.
 
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी नेते दाखल होण्यास कालपासून सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येताच सर्वप्रथम मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
 
कोणते नेते उपस्थित?
देशातील 26 राजकीय पक्षांचे प्रमुख आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे अनेक नेते 31 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहेत.
 
या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आणि मुंबईतील ग्रँड हयात हाॅटेल परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
पोलीस सुरक्षेच्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी मविआच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती.
 
31 तारखेला मुंबईत 150 हून अधिक राजकीय नेते मुंबईत दाखल होणार आहेत.
 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि इतर अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती