टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी डेबिट कार्ड दिल्यांनतर त्यामधून 40 रुपयांऐवजी चार लाख रुपयांचं पेमेंट करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोची - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असणा-या गुंदमी टोल नाक्यावर हा प्रकार घडला. उडुपीपासून 18 किमी अंतरावर हा टोल नाका आहे. यावेळी म्हैसूरमधील डॉक्टर राव या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत होते. मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 10.30 वाजता ते या टोलनाक्यावर पोहोचले. टोल भरण्यासाठी त्यांनी डेबिट कार्ड कर्मचा-याकडे दिलं. कर्मचा-याने कार्ड स्वाईप करुन पावती राव यांच्याकडे दिली. पण जेव्हा डॉ राव यांनी खात्यातून चार लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी हा प्रकार टोल कर्मचा-याच्या निदर्शनास आणून दिला. मात्र टोल कर्मचा-यांनी चूक मान्य करण्यास नकार दिला. डॉ राव तब्बल दोन तास त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर टोल नाक्यापासून पाच किमी अंतरावर असणा-या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार नोंद केली. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसोबत ते पुन्हा टोल नाक्यवर आले. त्यानंतर अखेर टोल कर्मचा-यानी चूक झाल्याचं मान्य केलं. तसंच सर्व पैसे चेक देऊन परत करतो असं आश्वासन दिलं. मात्र डॉ राव यांनी मला सर्व रक्कम लगेचच रोख हवी असल्याचं सांगितलं. यानंतर टोल नाक्यावरील कर्मचा-याने कलेक्शन कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी बातचीत करत 3,99,960 रोख रक्कम जमा करुन डॉ राव यांच्या हवाली केली.