फास्टॅग बसवण्याची तारीख वाढवली ही आहे नवीन तारीख

शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (15:32 IST)
राष्ट्रीय महामार्गांवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी केंद्र सरकारने दि. १ डिसेंबरपासून फास्टॅग बसवणे बंधनकारक आहे. पण आता त्याला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ सरकारने दिली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. 
 
केंद्र सरकारने दि. १ डिसेंबरपासून फास्टॅग बसवणे सर्वाना बंधनकारक केले असून, सध्याच्या स्थितीत फास्टॅगला मिळणारा प्रतिसाद पाहता दि. १ डिसेंबरपर्यंत १०० टक्के वाहनांना फास्टॅग लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. प्रत्यक्षात आतापर्यंत फास्टॅग असलेल्या वाहनांची संख्या जेमतेम २५ टक्क्यांच्या जवळपास असल्याचे समोर आले आहे. 
 
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोलनाक्यावरून मागील दोन दिवसांपूर्वी ये-जा केलेल्या वाहनांपैकी अनुक्रमे सुमारे ५ हजार ९२४ व ४ हजार ६८९ वाहनांनाच टॅग होता. एकूण वाहनांच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे २५ व २३ टक्के एवढेच आहे.
 
टोलनाक्यांवरील वाहनांना थांबण्यासाठी जाणारा वेळ, लांबच लांब रांगामधून सुटका करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व टोलनाक्यांवर शंभर टक्के वाहनांचा टोल फास्टॅगच्या माध्यमातूनच भरला जावा, असे उद्दिष्ट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे. विविध माध्यमातून याबाबत जनजागृतीही केली जात आहे. आता दि. १५ डिसेंबरपासून टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. विना फास्टॅग वाहनांसाठी महामार्गावर केवळ एकच लेन ठेवण्यात येणार असल्याचे संकेत प्राधिकरणाने दिले आहेत. तशी चाचपणी मागील काही दिवसांपासून घेतली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती