परीक्षेत कमी गुण दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केली

बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:49 IST)
Teacher Beaten By Student: झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका निवासी शाळेतील गणित शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. 9वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत त्याने कथितरित्या कमी गुण दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. 
 
घटना सोमवारी जिल्ह्यातील गोपीकंदर पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय अनुसूचित जमाती निवासी शाळेत घडली. झारखंड अॅकॅडमिक कौन्सिल (JAC) ने शनिवारी इयत्ता 9वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला ज्यामध्ये शाळेतील 32 पैकी 11 विद्यार्थ्यांनी ग्रेड-डीडी मिळवला आणि अनुत्तीर्ण झाले. रागाच्या भरात येऊन  विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना मारहाणही केली.
 
"शालेय व्यवस्थापनाने या घटनेबाबत कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्यामुळे याप्रकरणी कोणतीही एफआयआर नोंदविण्यात आलेली नाही." घटनेची पडताळणी केल्यानंतर, मी शाळा व्यवस्थापनाला तक्रार नोंदवण्यास सांगितले परंतु त्यांनी असे सांगून नकार दिला की यामुळे विद्यार्थ्यांचे करियर खराब होऊ शकते. असे पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले.पोलिसांनी म्हटले की, तक्रार आल्यानतंर या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
या  निवासी शाळेत 200 विद्यार्थी आहेत आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा या घटनेत सहभाग होता. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, शिक्षकांनी प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण दिल्याने ते परीक्षेत नापास झाले.पीडित शिक्षक याआधी शाळेचे मुख्याध्यापक होते. मात्र काही कारणांनी त्यांना हटवण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रकारानंतर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांवर दोन दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलीअसून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती