दुर्गापूर (पश्चिम बंगाल): मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला जाणारे स्पाइसजेटचे विमान अचानक वादळात अडकले. विमान दुर्गापूर विमानतळावर उतरणार असतानाच वादळाचा सामना करावा लागला. त्यामुळे विमानाच्या केबिनमधून सामान खाली पडू लागले. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने वैमानिकाने विमानाचे विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. सर्व जखमी प्रवाशांवर विमानतळावर उपचार करण्यात आले, विमानात 185 प्रवासी होते.
काय म्हणाले स्पाइसजेट?
स्पाईसजेटने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बोईंग B737 विमान सुरक्षित लँडिंग करण्यात यशस्वी झाले आणि जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली. गरज भासल्यास प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पश्चिम बंगालमधील खराब हवामानामुळे विमानात गोंधळ सुरू असताना पायलटने सीट बेल्ट लावण्याचे संकेत दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फूड ट्रॉलीला धडकल्याने काही प्रवासी जखमीही झाले आहेत.
विमान कंपनीने खेद व्यक्त केला
स्पाइसजेटने या दुर्दैवी घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत दिली आहे. विमान अजूनही दुर्गापूर विमानतळावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.