केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका
देशातील काही राज्यांकडून सरसकट सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
यामागचे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर केंद्र सरकारने अधिकृतरीत्या भूमिका स्पष्ट केली आहे. देशात कुणाला लस हवी यापेक्षा त्याची कुणाला जास्त गरज आहे या उद्देशातून लसीकरण सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आणि यामागचे कारण सांगितले.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत एकूण 43 लाख लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी दिली. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. तर आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या 8 कोटी 31 लाखांर्पंत पोहोचली आहे.