‘माझ्या मुलाला उघडं करून झाडाला उलटं टांगून मारलं, त्याच्या अंगावर लघवी केली’

रविवार, 27 ऑगस्ट 2023 (17:36 IST)
शेळी आणि कबुतरं चोरी केल्याच्या संशयावरून अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील 4 तरुणांना झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे..
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेतील 6 आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
 
प्रकरण काय?
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणि काही कबुतरे चोरीला गेले होते.
 
चोरीच्या संशयावरून शुक्रवारी (26 ऑगस्ट) सकाळी चार तरूणांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण करण्यात आली.
 
त्यांतर जखमी तरूणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमी तरुणाची आई श्रीकला माळी यांनी घटनेवषयी माहिती देताना सांगितलं की, “माझ्या मुलाला ते बोलायला आले आणि सोबत घेऊन गेले. मी पण त्यांच्या मागे गेले. तर त्यांनी माझ्या मुलाला दोन-तीन झापडी मारल्या. मग पोरं बोलवायला सांगितलं. तुमच्या मुलाचं काही नाही म्हणून त्यांनी मला घरी काढून दिलं.
 
“मी घरी आले. पण घरात मला आवाज यायला लागला. त्यामुळे मी पुन्हा तिकडे गेले, तर माझ्या मुलाला उघडं केलेलं होतं. माझ्या पोराला मारलं त्यांनी. मी गेले तेव्हा त्यांनी माझ्या पोराच्या अंगावर लघवी टाकली. मीठ टाकून माझ्या पोराला मारलं. मी सोडवायला गेले, तर माझ्याशी धक्काबुक्की केली.”
 
या घटनेतील दुसऱ्या पीडित तरुणाची आई सुरेखा खंडागळे यांनी सांगितलं, “मी माझ्याला घरून नेलं त्यांनी. मुलाला उघडं करुन मारहाण केली. त्यांच्यावर मीठ टाकून मारहाण केली.”
 
घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको
या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं केली आहे.
 
या घटनेच्या निषेधार्थ हरेगावा फाटा इथं पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
 
आरपीआयचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी म्हटलं की, “दलित कुटुंबातील मुलांना चोरीच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या अंगावर लघवी करण्यात आली. त्यांना खूप वेळ बांधून ठेवण्यात आलं होतं. या घटनेचा आम्ही निषेध केला आहे. आरोपींना तत्काळ अटक करावी ही आमची मागणी आहे.”
 
दरम्यान, अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित तरुणांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली.
 
या तरुणांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून दिलासा दिला, असं ट्वीट त्यांनी केलं.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दवाखान्यात जाऊन तरूणांची भेट घेतलीय.
 
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “कबुतर आणि शेळ्या चोरी करण्याच्या संशयावरुन या तरुणांना मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणातील 6 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. बाकी आरोपी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
 
मारहाण करणाऱ्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
 
या घटनेबाबत समाजमाध्यमांवर कुणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
 
ही अनास्था बदलल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, “श्रीरामपूर प्रकरणातील एका पीडित मुलाशी आणि त्याच्या आजी सोबत आताच फोनवर बोलणे झाले. त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्यावर लघवी करण्यात आली, त्याच्यावर थुंकण्यात आले, त्याला थुंकी चाटायला भाग पाडले गेले, नागवलं गेलं आणि झाडाला उलटं लटकवलं गेलं. भयानक आहे ना?
 
“ना इथला जातीय भेदभाव, तुच्छता, अपमान, शिवीगाळ, हिंसा, क्रूरता नवीन आहे, ना या सगळ्यांबद्दल असणारी सरकारी अनास्था.
 
“वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मी आपल्याला शब्द देतो, या अनास्थेला आव्हान देऊन तिला बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”
 




Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती