स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना उद्देशून काय म्हणाले? वाचा

गुरूवार, 15 ऑगस्ट 2024 (08:29 IST)
आज 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले.
 
पंतप्रधान म्हणाले, आज देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या वीरपुत्रांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आपला देश त्यांच्याप्रती ऋणी आहे. अशा प्रत्येक महापुरुषाप्रती आम्ही श्रद्धा प्रकट करत आहोत.
 
यावर्षी तसेच गेल्या अनेक वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे आपल्या काळजीत भर पडली आहे. यामध्ये आपण अनेक लोकांना आणि कुटुंबांना तसेच संपत्तीला गमावलं आहे. राष्ट्राचं यामुळे नुकसान झालं आहे.
 
मी या लोकांप्रती माझ्या भावना व्यक्त करतो आणि या संकटकाळात देश त्यांच्याबरोबर मदतीला आहे असा विश्वासही त्यांना देतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
तरुण असोत वा महिला किंवा आदिवासी, सर्वांनी गुलामीविरोधात लढा दिलाय. 1857 च्या आधीही स्वातंत्र्य संग्रामात अनेक आदिवासी क्षेत्रात लढा दिला होता याला इतिहास साक्षीदार आहे.
 
त्यावेळच्या लोकसंख्येच्या हिशेबाने 40 कोटी लोकांनी एक स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता.
 
जर 40 कोटी लोक गुलामगिरीच्या श्रृंखला तोडू शकतात तर 140 कोटी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्येक अडचणीवर मात करुन भारताला समृद्ध करू शकतात. आपण 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पार करू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती