मनोहर पर्रिकर आज घेतील मुख्यमंत्रिपदाची शपथ

मंगळवार, 14 मार्च 2017 (11:02 IST)
सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य आणि 'डाउन टू अर्थ' नेते म्हणून ओळखले जाणारे मनोहर पर्रिकर आज गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा 'चमत्कार' एका 'फिक्सर'मुळे होतोय, असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण, खरोखरच एका 'फिक्सर'च्या मदतीनेच भाजपने गोव्याचे सत्तासमीकरण जुळवले आहे, आणि आता मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री होत आहेत.
 
भाजपचे गोव्यातील सत्तेचे स्वप्न साकार करणारे हे 'फिक्सर' म्हणजे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर टीकास्त्र सोडताना खुद्द पर्रिकरांनीच त्यांचा उल्लेख 'फिक्सर' असा केला होता. आता त्यांनीच पर्रिकरांचे मुख्यमंत्रिपद 'फिक्स' केले आहे.
 
गोव्यात भाजपला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. ४० पैकी १७ जागा जिंकून काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला. सत्ता स्थापनेसाठी २१ची 'मॅजिक फिगर' आवश्यक होती. त्यामुळे त्यांना फक्त चारच आमदार कमी पडत होते. पण, भाजपनं १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने त्यांना संधीच दिली नाही. एका फाइव्ह स्टार हॉटेलमधल्या बैठकीत गोव्यातील राजकीय नाट्याला कलाटणी मिळाली आणि त्याचे सूत्रधार होते विजय सरदेसाई.

वेबदुनिया वर वाचा