उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102 भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9 किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं. भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.