गुप्तधन देतो सांगून तो जमिनी ताब्यात घ्यायचा, स्फोट घडवायचा, त्याने 11 जणांना विष पाजून मारलं आणि

शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (18:35 IST)
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून हत्यांचा सपाटा लावणाऱ्या एका व्यक्तीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केलाय.
पूजा केल्याने गुप्तधन प्राप्त होईल, असा दावा करत रमती सत्यनारायण (वय वर्ष 47) उर्फ सत्यम यादव याने 11 जणांची हत्या केली, असं तेलंगणातील नागरकर्नूल जिल्हा पोलिसांनी सांगितलं आहे. 
 
नागरकर्नूल जिल्हा मुख्यालयातील इंद्रनगरमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.
 
रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या बेपत्ता प्रकरणाचं गूढ
प्रत्यक्ष पूजेच्यावेळी काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवरील विषारी पदार्थ अॅसिडमध्ये मिसळून त्याने लोकांची हत्या केल्याचं पोलिसांनी उघड केलंय.
 
हैदराबाद येथील रिअल इस्टेट व्यावसायिक बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास करत असताना, आरोपीला अटक केल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
गोवुला व्यंकटेश हे तेलंगणातील वनपर्थी जिल्ह्यातील विपनगंडला तालुक्यातल्या बोलाराम गावात रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांचं कुटुंब हैदराबादच्या लंगर हाऊस भागात राहतं.
 
26 नोव्हेंबर रोजी व्यंकटेश यांची पत्नी लक्ष्मी नागर हिने कर्नूल शहर पोलीस स्टेशनमध्ये आपला पती पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
 
"21 नोव्हेंबर रोजी ते घरातून गेले. कर्नूल शहरात ते सत्यनारायणला भेटण्यासाठी गेलेले. पण तेव्हापासून त्यांचा फोन लागत नाहीए.
 
पाच दिवस झाले त्यांचा त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. संशय आल्याने आम्ही नागरकर्नूलला जाऊन चौकशीसुद्धा केली, पण कुठेच कसलीही माहिती मिळाली नाही.
 
आम्ही 26 तारखेला पोलिसांत तक्रार दाखल केली,” असं व्यंकटेश यांची पत्नी लक्ष्मीने स्पष्ट केलं.
 
तीर्थामधून विष
दोघंही नागरकर्नूल परिसरातच राहत असल्याने व्यंकटेश एका मित्राच्या मदतीने सत्यम यादवच्या संपर्कात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
सत्यम यादव हा व्यंकटेश यांना सांगायचा की तो गुप्तधन शोधून काढू शकतो. त्यासाठी त्यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून पूजा करत असल्याचा त्याचा दावा होता आणि तो स्वतः ते शिकल्याचं सांगत असे.
 
मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की, व्यंकटेश आणि सत्यम यादव यांची रिअल इस्टेटच्या व्यवसायातून एकमेकांशी ओळख झाली होती.
 
''काही दिवसांपूर्वी व्यंकटेश यांनी सत्यम यादवला त्याच्या मित्रांना सोबत घेऊन गुप्तधन मिळवण्यासाठी पूजा करण्यास सांगितलं. तेव्हा सत्यम यादवला असं वाटलं की व्यंकटेश यांना एकट्यालाच बोलवायला हवं आणि ते एकटे आले तरंच त्याला गुपितं बाहेर काढता आणि पूजा करता येईल," असं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलीस पुढे सांगतात,
 
गुप्तधन मिळविण्यासाठी त्याला एका माणसाचा बळी द्याला लागेल, असं त्याच्याकडून व्यंकटेशला सांगण्यात आलं. त्यासाठी तीन गर्भवती महिलांचा बळी द्यावा लागेल असंही तो म्हणाला. पूजेसाठी आधीच त्याने नऊ लाख रुपये घेतले होते.
 
नंतर नरबळीला घाबरून व्यंकटेश यांनी त्यांचे पैसे परत मागितले. त्यानंतर यादव त्यांना म्हणाला की, माणसाचा बळी देण्याची गरज नाही आणि पूजेसाठी एकच व्यक्ती पुरेशी आहे. त्याने त्यांना शहराजवळील एका टेकडीवर नेलं.
 
तिथे पूजा करत असताना त्याने तीर्थामध्ये विषारी पदार्थ मिसळून त्यांची हत्या केली. त्यामध्ये नेमकं काय घातलं गेलं याचा आम्हाला अजून शोध घ्यायचाय. त्यानंतर त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं.
 
जोगुलांबा गडवाला झोनचे डीआयजी एलएस चौहान यांनी सांगितलं.
 
लोकांना मारल्यानंतर तो काय करत असे?
गुप्तधनासाठी केल्या जाणाऱ्या पुजेबद्दल कुणालाही काहीही न सांगण्याची अट सत्यम यादवकडून घातली जाई. त्याला जराही शंका आली तर तो त्यांना कडक शब्दांत ताकीद देत असे.
 
तो लोकांना घाबरवत असे की त्यांनी कुणाला सांगितलं तर गुप्तधनातील हिस्सा त्यांना द्यावा लागेल आणि पोलिसांना कळवलं तर त्यांना त्यातला एक रुपयाही मिळणार नाही.
 
त्यामुळे एकाही पीडिताने त्याच्याबद्दल तक्रार केली नाही, असं पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी सांगितलं.
 
सत्यम यादवने कशाप्रकारे हत्या केल्या हे त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
 
"गुप्तधनाला बळी पडलेल्या लोकांना तो निर्जनस्थळी घेऊन जात असे. तो काहीतरी बडबडायचा आणि तिथे लिंबू ठेवून पूजा करत असल्याचं भासवायचा.
 
अशाप्रकारे तो लोकांवर अशी काही जादू करायचा की लोक त्याच्या पद्धतीने वागायचे. ते नकळतपणे त्याच्या प्रभावाखाली येत असंत.
 
पूजेनंतर तो जिलेडू आणि गनेरूच्या झाडांपासून घेतलेलं विष आणि ॲसिड दुधात मिसळून त्याचं तीर्थ बनवायचा. ते प्यायल्यानंतर पीडिताचा मृत्यू झाला तर तो त्यांच्याकडील सामान आणि दागिने घेऊन पळून जायचा. जर पीडित मरण न पावता बेशुद्ध पडला तर तो त्याला दगडाने ठेचून ठार करायचा.”
 
टोकाची मानसिकता म्हणजे काय?
सत्यम यादव हा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. सर्वप्रथम त्याने गुप्तधनासाठी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला.
 
पुढे जसजसं लोकांसोबत त्याच्या ओळखी वाढू लागल्या तसतसं त्याने गुप्तधनाची स्वप्न दाखवत साडेतीन वर्षांत पुजेच्या नावाने लोकांच्या हत्या केल्या.
 
"तो एक अतिशय गंभीर मानसिक रूग्ण आहे. त्याला वाटतं की लोकांना मारणं हे भाज्या कापण्याइतकं सोपं काम आहे. याच मानसिकतेतून त्याने 11 जणांची हत्या केली," असं डीआयजी एल. एस. चौहान यांनी सांगितलं.
 
उस्मानिया विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख सी. बीना यांनी एकामागोमाग एक लोकांची हत्या करण्याला ‘मनोविकार मानसिकता’ म्हटलं आहे.
 
"या प्रकारचे लोक सामान्य दिसतात. ते सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात. पण त्यांची मानसिकता मनोरूग्णासारखी असते. ते इतक्या सहजतेने एखादी हिंसा करतात की कुणीही पाहू शकणार नाही. त्यांची ओळख पटवणंदेखील कठीण होऊन जातं,” असं बीना यांनी बीबीसीला सांगितलं.
 
बीना म्हणतात की माणसाने लोभी होण्यापेक्षा स्वत:च्या मर्यादा न ओलांडणं केव्हाही चांगलं.
 
एका प्रकरणात चार खून
डीआयजी एल. एस.चौहान यांनी सांगितलं की, सत्यम यादवने सात घटनांमध्ये मिळून 11 जणांच्या हत्या केल्या. यातील एका प्रकरणात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली.
 
14 ऑगस्ट 2020 रोजी वनपर्थी जिल्ह्यातील नागापूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये हजीराबी (60), अश्मा बेगम (32), खाजा (35), अशरीन (10) यांचा समावेश आहे. गुप्तधनासाठी पूजा करताना त्यांची हत्या करण्यात आलेली.
 
त्यावेळी या हत्या कुणी केल्या हे स्पष्ट झालं नव्हतं. या हत्यांमागे सत्यनारायण असल्याचं आमच्या तपासातून समोर आलंय.
 
सुरूवातीला संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सत्यम यादवने दिलेल्या रसायनामुळे कुटुंबातील सर्वजण मृत्यूमुखी पडले होते.
 
नोव्हेंबर 2021 मध्ये नागरकर्नूल जिल्ह्यातील एंडाबेट्स येथील सलीम पाशा यांचीदेखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.
 
तसंच कोल्लापूर तालुक्यातल्या मुक्कीदिगुंडम गावचे अरेपल्ली श्रीनिवास, नागर कर्नूल तालुक्यातल्या गन्यागुचे वसरला लिंगास्वामी, निरुडू कलवकुर्तीजवळील तिम्मरासीपल्ली येथील संपथी श्रीधर रेड्डी, अनंतपूर जिल्ह्यातील कोडेरू तालुक्यातले थिगालापल्ली येथील राम रेड्डी, तिरुपतमा हत्या, कर्नाटक राज्यातील रायचूर भागातील व्यक्तीच्या मृत्यूची घटना, असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
 
शिवाय चौहान म्हणाले की, “हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आम्हाला सापडले आहेत.”
 
न्यायालयाच्या परवानगीने पोलीस कोठडीत त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यातून अधिक माहिती बाहेर येईल, असं त्यांनी सांगितलं.
 
पैसा आणि जमीन
सत्यम यादवने केलेल्या हत्यांमागील कारणं शोधण्यासाठी पोलीस अधिक सखोल चौकशी करत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो लोकांकडून जमिनीची नोंदणी करण्याच्या नावाने पैसे घ्यायचा आणि त्यांची हत्या करायचा.
 
"त्याने वानपर्थी येथील पीडितांकडून भूखंडाची नोंदणी करून घेतली. कर्नूल प्रकरणात जमिनीची नोंदणी केलेली. रायचूर प्रकरणात मारले गेलेले वडील आणि मुलीकडून त्याने साडेतीन एकर जमीनची नोंदणी करून घेतली होती."
 
पीडितांच्या गुप्तधनाच्या लोभापोटी त्याने हे गुन्हे केल्याचं एल. एस. चौहान यांनी सांगितलं.
 
नागरकर्नूल शहरातील जमिनीच्या दुहेरी नोंदणी प्रकरणी त्याच्याविरुद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, असंही ते म्हणाले.
 
डिटोनेटर्सचा ताबा
पोलिसांनी आरोपी सत्यनारायणकडून डिटोनेटर्स जप्त केले आहेत. त्याच्याकडे डिटोनेटर्स कशासाठी होते याचा तपास पोलीस करत आहेत.
 
तो साधारणपणे लोकांना मारण्यासाठी ॲसिड आणि वेगवेगळ्या प्रकारचं विष वापरायचा.
 
मात्र, त्याच्याकडे सापडलेल्या डिटोनेटर्सची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अतिशय रंजक गोष्टी समोर आल्या.
 
"पीडितांचा विश्वास बसावा म्हणून तो स्वत:जवळ डिटोनेटर्स बाळगायचा. गुप्तधनाचा शोध घेत असताना खोदकामाच्या दरम्यान एखादा दगडाचा स्फोट घडवून आणण्यासाठी तो डिटोनेटर्स पेरून ठेवत असे. तेदेखील जप्त करण्यात आले आहेत,” असं नागरकर्नूल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी सांगितलं.
 
त्याचबरोबर पाच मोबाईल फोन, दहा सिमकार्ड, एक कार आणि रसायनं असलेले बॉक्सही जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पोलिसांवर काय टीका होतेय?
सत्यनारायण याच्या अटकेनंतर पोलिसांवरही टीका केली जातेय.
 
यावर्षी एप्रिलमध्ये हैदराबादच्या एका महिलेने सत्यनारायणाविरोधात नागरकर्नूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या जमिनीची बेकायदेशीर नोंदणी झाल्याचा तिने दावा केला होता.
 
पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, अशी टीका त्यांच्यावर केली जातेय. पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार, त्यानंतरही सत्यनारायणाने हत्यासत्र सुरूच ठेवल्याचं दिसतं.
 
"आम्हाला पोलिसांवरील आरोपांबाबत माहिती मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. जर पोलिसांचे आरोपीशी संबंध असल्याचं आढळून आलं तर आम्ही नक्कीच कारवाई करू," असं पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी बीबीसीला सांगितलं.
इशारा : या लेखात अस्वस्थ करणारा मजकूर आहे.

Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती