वीर दास यांच्या 'या' कवितेमुळे भारताचा परदेशात अपमान झाला आहे का?

बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (17:50 IST)
Twitter
कॉमेडियन वीर दास यांच्या एका व्हीडिओवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. काही युझर्स या कवितेच्या बाजूने तर काही विरोधात प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
वीर दास यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) त्यांच्या युट्यूब चॅनलवर 6 मिनिटांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीच्या जॉन एफ. केनेडी सेंटरमध्ये झालेल्या एका शोमधला आहे.
 
यात वीर दास यांनी एक स्वगत सादर केलं. त्याचं शीर्षक 'आय कम फ्रॉम टू इंडियाज' म्हणजे 'मी दोन प्रकारच्या भारतातून आलेलो आहे,' असं होतं.
 
भारतात असलेला विरोधाभास त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून मांडला. हा व्हीडिओ प्रसिद्ध होताच काही तासांमध्येच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रिया दोन गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत.
अनेकजण अशा गोष्टी थेटपणे मांडल्याबद्दल वीर दास यांचं कौतुक करत आहेत, तर काही जण त्यांच्यावर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत जोरदार टीका करत आहेत.
 
आशुतोष दुबे नावाच्या एका व्यक्तीनं वीरदास यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत एक लेखी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी वीरदास यांच्यावर भारताविरोधात अभद्र वक्तव्य केल्याचं म्हटलं आहे.
 
त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून भारतात लोकशाही धोक्यात आहे असं वाटतं. पण तो निराधार आरोप आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
दिल्लीच्या तिलक मार्ग पोलिस ठाण्यातही वीर दास यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदित्य झा नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.
 
अमेरिकेत आयोजित एका कार्यक्रमात एका कॉमेडियननं देशाच्या विरोधात अभद्र वक्तव्य केल्याचं त्यात म्हटलं आहे.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी मुलं एकमेकांचा हातही मास्क परिधान करून पकडतात, मात्र नेते मास्क शिवाय एकमेकांची गळाभेट घेतात.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी एक्यूआय (AQI) 9000 आहे, तरीही रात्री छतावर झोपून आम्ही चांदण्या मोजत असतो.
 
मी अशा भारतातून आलो आहे, जिथं लोक दिवसा महिलांची पूजा करतात आणि तिथंच रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतात.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी आम्ही ट्विटरवर बॉलिवूडबाबत गटांमध्ये विभागले जातो, पण थिएटरच्या अंधारात बॉलिवुडमुळेच पुन्हा एकत्र येतो.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी पत्रकारिता संपली आहे आणि पुरुष पत्रकार एकमेकांची केवळ वाहवा करत आहेत, तर महिला पत्रकार रस्त्यांवर लॅपटॉप घेऊन सत्य सांगत आहेत.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी तुम्ही आमच्या हसण्याचा आवाज घरांच्या भिंतीच्या पलिकडे बाहेरपर्यंतही ऐकू शकता...
 
आणि मी अशाही भारतातून आलो आहे, जिथं कॉमेडी क्लबच्या आतून हसण्याचा आवाज आला तर त्याच्या भिंतीही तोडल्या जातात.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी बहुतांश लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची आहे, तरीही आम्ही 75 वर्षांच्या नेत्यांच्या 150 वर्ष जुन्या कल्पना ऐकत बसतो.
 
मी अशा भारतातून आलो आहे, जिथं आम्हाला पीएमशी (पंतप्रधान) संबंधित सगळी माहिती दिली जाते, पण आम्हाला पीएमकेअर्सबाबत काहीही माहिती दिली जात नाही.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी महिला साडी आणि स्निकर परिधान करतात, तरीही त्यांना अशा ज्येष्ठाचा सल्ला घ्यावा लागतो, ज्यानं कधीही साडी परिधान केली नाही.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी शाकाहारी असल्याचं अभिमानानं सांगितलं जातं, पण त्याच भाज्या उगवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र चिरडलं जातं.
 
मी अशा भारतातून आलो आहे, ज्याठिकाणी आम्ही सैनिकांना पूर्ण पाठिंबा देतो, पण तोपर्यंतच जोपर्यंत त्यांच्या पेन्शनबाबत बोललं जात नाही.
 
मी अशा भारतातून आलो आहे, जो आता शांत बसणार नाही...
 
पण मी अशा भारतातून आलो आहे, जो बोलणारही नाही.
 
मी अशा भारतातून आलो आहे, जो मला आमच्या वाईट गोष्टींबाबत बोलल्यामुळं दोष देईल...
 
आणि मी अशा भारतातून आलो आहे, जिथं लोक स्वतःच्या कमतरतांबाबत मोकळेपणानं बोलतात.
 
मी अशा भारतातून आलो आहे, जो हे पाहील आणि म्हणेल, 'ही कॉमेडी नाही...जोक कुठं आहे?'
 
आणि मी अशा भारतातूनही आलो आहे, जो हे पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की हा जोकच आहे, फक्त विनोदी नाही.
 
दोन गटांत विभागले लोक
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी वीर दास यांना पाठिंबा दर्शवला आहे.
 
''वीर दास, यात शंका नाही की दोन भारत आहेत. पण भारतीयानं जगाला ते सांगावं असं आम्हाला वाटत नाही. आपण असहिष्णू आणि नाटकी आहोत.''
''काही लोकांच्या चुकीच्या गोष्टींचा संदर्भ देशाच्या बाबतीत मांडणे आणि संपूर्ण जगासमोर अपमान करणं हे योग्य नाही. विदेशी सत्तेच्या काळात ज्या लोकांनी भारताची प्रतिमा पाश्चिमात्य जगासमोर लुटेरे आणि सपेरे यांचा देश अशी मांडली, त्यांचं अस्तित्व अजूनही संपलेलं नाही,'' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
 
''टू स्टँड अप" म्हणजे काय याची खरी जाणीव असलेल्या एका कॉमेडियनला शारीरिक नव्हे तर नैतिकतेच्या आधारे उभं राहण्याचा - भूमिका घेण्याचा अर्थ माहिती आहे. वीर दास लाखो लोकांच्या वतीने बोलले आहेत.
 
6 मिनिटांच्या व्हीडिओमध्ये ते दोन प्रकारच्या भारताबाबत बोलले आणि ते कोणत्या भारतासाठी बोलले हे सांगितलं. हा जोक आहे, मात्र तो विनोदी नाही,'' असं काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी ट्वीट केलं.
या व्हीडिओतील एक ओळ लिहित पत्रकार बरखा दत्तनं वीर दास यांचे आभार मानले आहेत.
''वीर दास अशा भारतातबाबत सांगत आहेत जिथं ते राहतात, ते नक्की ऐका. कारण आज आपण अशा स्थितीत आहोत, ज्याठिकाणी जे खरं आहे ते सांगणंही धाडसाचं ठरतं,'' असं स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी म्हटलं.
''धाडसी, दृष्टीकोन असलेल्या आणि प्रतिभावान वीर दासबरोबर उभं राहत मी ही लिंक शेअर करत आहे," असं पत्रकार वीर संघवी यांनी लिहिलं.
''वीर दास तुम्ही अशा भारतातील आहात, जिथं तुम्ही तुमच्याच देशाचा अपमान करून पोट भरत आहात. तुम्ही अशा भारताचे आहात, जो तुमच्या घाणेरड्या, अपमानास्पद बडबडीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ती, करत राहण्याची परवानगी देतो.
 
तुम्ही अशा भारतातील आहात, ज्यानं तुमच्या खोट्या टीकेला दीर्घकाळ सहन केलं आहे,'' असं भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी लिहिलं.
''ही कॉमेडी आहे? अमेरिकेच्या केनडी सेंटरमध्ये वीर दास म्हणतात - 'मी अशा भारतातून आलो आहे, जिथं लोक दिवसा महिलांची पुजा करतात आणि तिथंच रात्री त्यांच्यावर सामुहिक बलात्कार होतात. कदाचित ते असं करत असतील, पण अशाप्रकारे देशाचं वर्णन करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?'' असं रोझी नावाच्या एका युझरनं लिहिलं.
वीर दास यांची प्रतिक्रिया
या वादांमध्ये वीरदास यांनी ट्विटरवर याबाबत त्यांचं म्हणणं मांडलं. ''मी यूट्यूबवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हीडिओ भारतातील दुटप्पी परिस्थितीबाबत आहे.
 
दोन अशा बाजू ज्या पूर्णपणे भिन्न आहेत. प्रत्येक देशात अशाप्रकारे एक चांगली आणि एक वाईट बाजू असेत, यात काहीही लपून राहिलेलं नाही.''
 
''व्हीडिओद्वारे आपल्याला विनंती करण्यात आली आहे की, आपण महान आहोत हे आपण विसरायला नको. तसंच आपण कशामुळं महान बनलो याकडं कधीही दुर्लक्ष करू नये.
 
व्हीडिओच्या अखेरीस देशभक्तींनं ओतप्रोत टाळ्यांचा गडगडाट झाला. या टाळ्या आपण सगळे प्रेम करत असलेल्या आणि आपला विश्वास असलेल्या तसेच अभिमान असलेल्या या देशासाठीच आहेत.
''बातम्यांच्या मथळ्यांपेक्षा (हेडलाईन) वेगळाही आपला देश आहे हे सांगणं, हा या व्हीडिओमागचा उद्देश आहे. त्यातील सखोल संदेश आणि सौंदर्य यासाठी सर्वांनीच टाळ्या वाजवल्या.
 
''व्हीडिओतील काही भागासाठी तुम्हाला भडकवलं जात आहे. तसं होऊ देऊ नका. लोकांनी भारतासाठी जल्लोष केला आणि तो द्वेषाचा नव्हे प्रेमाचा आवाज होता. लोकांनी आदरानं भारतासाठी टाळ्या वाजवल्या."
''केवळ नकारात्मकतेमुळं तुमचं एवढं कौतुक होऊ शकत नाही, किंवा तुमची सगळी तिकिटं विकली जाऊ शकत नाहीत. तुम्हाला स्वतःचा अभिमान असेल तेव्हाच हे होऊ शकतं.
 
मला माझ्या देशावर अभिमान आहे, तो कायम माझ्याबरोबर असतो. प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी लोक भारताच्या सन्मानार्थ उभे राहतात, ते माझ्यासाठी पवित्र प्रेम आहे."
 
''मी त्या दर्शकांना म्हटलं तेच तुम्हाला सांगेन, - आपल्याला प्रकाशावर लक्ष केंद्रीत करायचं आहे, आपण का महान आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आणि लोकांमध्ये प्रेम पसरवायचं आहे.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती