जवाद चक्रीवादळ : मुंबई, पुणे, कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता
शनिवार, 4 डिसेंबर 2021 (07:55 IST)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल आणि हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय.
जवाद चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खबरदारी म्हणून ओडिशातील 19 जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तर, "ओडिआरएफ, एनडीआऱएफ अशा 247 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर 20 टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांश जिल्ह्यांमधील लोक घरातून बाहेर निघायला तयार नाहीयेत. मदतकार्य आजपासून सुरू केलं जाईल," असं ओडिशाचे मदतकार्य विभागाचे आयुक्तांनी म्हटलं आहे.
आंध्र प्रदेश सरकारनं आतापर्यंत 3 जिल्ह्यांतील 54 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. एनडीआऱफ आणि इतर टीम बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 1 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागानं गुरुवारी (2 डिसेंबर) जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट घोषित केला होता.
यासहित 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
3 ते 5 डिसेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छिमारांना देण्यात आल्याचं हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलंय. एएनआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
दास म्हणाले, "4 डिसेंबरच्या दुपारपासून सीमावर्ती भागात हवेचा वेग 60 ते 80 किलोमीटर दरम्यान असेल. या भागातील लोकांनी घराच्या आत राहायला हवं. पर्वतीय प्रदेशात भूस्खलन होण्याची शक्यता आहे."
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
याचदरम्यान अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय.
परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात उत्तर भागात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलीय.
मोदींनी घेतली बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुववारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि मदत तसंच बचावकार्याशी संबंधित माहिती जाणून घेतली.
एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवल यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींना पुढच्या 3 दिवसांच्या हवामानाबाबतची माहिती देण्यात आली.
ते म्हणाले, "हवामान विभागाच्या माहितीनुसार आम्ही पंतप्रधान मोदींना पुढच्या 3 दिवसांच्या हवामानाची माहिती सांगितली आहे. गृहसचिवांनी या संदर्भात केल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रात 29 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवेचा वाग हा प्रती तास 90 ते 100 किलोमीटर असू शकतो, असं म्हटलं जात आहे."
झारखंडवर परिणाम
जवाद चक्रीवादळाचा ओडिशाच्या शेजारील राज्य झारखंडवरही परिणाम होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
रांची येथील हवामान विभागाशी संबंधित अभिषेक आनंक यांनी एएनआयला सांगितलं, "जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झारखंड राज्याला अद्याप कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान या वादळाचा प्रभाव ओसरताना दिसेल.
"3 डिसेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर, सरायकेला खरसावा, चायबासा, खुंती आणि रांचीमधील काही भागात तुरळक पाऊस पडू शकतो."