10 वीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जाळलं, मृत्यूआधी म्हणाला, 'त्यांना सोडू नका'

रविवार, 18 जून 2023 (11:21 IST)
“तो रोज पहाटे पाच वाजता शिकवणीसाठी निघायचा. शुक्रवारीही तो त्याच वेळी गेला. अर्ध्या तासानंतर आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यावर कोणीतरी हल्ला केल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. याआधीही त्याला कोणीतरी मारलं होतं, आम्हाला वाटलं होतं की तसंच काहीतरी झालं असेल. पण कोणीतरी त्याचा जीव घेईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं."
 
16 जूनची घटना सांगताना अमरनाथची मामी रडू लागली.
 
आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चेरुकुपल्ली मंडळातील राजावोलू परिसरात शुक्रवारी (16 जून) अमरनाथची हत्या करण्यात आली.
 
दहावीचा विद्यार्थी उप्पला अमरनाथची ज्या क्रूरतेने हत्या झाली त्यामुळे लोक संतापले आहेत.
 
हल्ल्यानंतर अमरनाथला पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आलं. या घटनेनंतर संपूर्ण आंध्र प्रदेशातील लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर अमरनाथ त्याई आई आणि मोठ्या बहिणीसोबत आजीच्या घरी राहत होता.
 
उप्पला वेरी पालेम गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या राजावोलू हायस्कूलमध्ये तो शिकत होता. तिथंच त्यानं ट्यूशनही लावलं होतं.
 
तो ज्या मार्गाने शाळेत जायचा आणि त्याची शिकवणीला जायची वेळ हेच त्याच्या हत्येचं कारण बनल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
 
अमरनाथचे शेवटचे शब्द
अमरनाथ पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडला. अवघ्या दहा मिनिटांत आरोपीनं त्याला वाटेत अडवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय व्यंकटेश्वर रेड्डी हा या प्रकरणातील आरोपी आहे.
 
सायकलवरून शिकवणीसाठी जाणाऱ्या अमरनाथला वाटेत अडवून मक्याच्या ढिगाऱ्याच्या मागे ओढत नेलं. येथेच त्याच्यावर हल्ला करून पेट्रोल टाकून जाळण्यात आलं.
 
अमरनाथचा एक व्हीडिओही शेअर केला जात आहे. ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये जात असताना अॅम्ब्युलन्समध्ये त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगत आहे. मृत्यूपूर्वीचे हे त्याचे शेवटचे शब्द आहेत.
 
या व्हिडिओमध्ये अमरनाथ म्हणतोय की, “शाळेत जात असताना त्यांनी मला अडवले. मला मुख्य रस्त्यापासून दूर नेलं. त्यांनी माझ्या तोंडात कापड भरलं. माझे हात कमरेमागे बांधले. माझ्यावर ताडपत्री टाकण्यात आली आणि नंतर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. ज्यांनी माझ्यासोबत हे कृत्य केलं त्यांच्याबाबतही असंच घडलं पाहिजे. त्यांना सोडू नका."
 
गुंटूर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच अमरनाथचा मृत्यू झाला. गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.
 
अमरनाथचा मृतदेह त्याच्या गावी घेऊन जाणाऱ्या वाहनाला वाटेत जमावानं घेरलं. अमरनाथचे नातेवाईक, अनेक मागासवर्गीय संघटना आणि विरोधी तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर निदर्शनं केली.
 
मोठ्या बहिणीच्या छेडछाडीला केला होता विरोध
अमरनाथच्या मृत्यूप्रकरणी चेरुकुपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येशिवाय पोक्सो कायद्याशी संबंधित कलमेही लावण्यात आली आहेत. त्याची आई उप्पला माधवी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
 
बीबीसीशी बोलताना अमरनाथच्या नातेवाईक पी लक्ष्मी दावा करतता की, “अमरनाथची मोठी बहीण बारावीत शिकत आहे. वेंकी नावाचा तरुण तिला त्रास देत होता. तिनं वेंकीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. मात्र ती घाबरत असल्याने तिनं याबाबत घरी काहीच सांगितलं नव्हतं. तिचा भाऊ अमरनाथनं फोनवर एक मेसेज पाहिला आणि त्याला या प्रकरणाची माहिती मिळाली.”
 
लक्ष्मी पुढे सांगतात, “वेंकटेश्वर रेड्डीनं शिक्षण सोडलं आहे आणि तो आता कोणतंही काम करत नाही. कधीकधी मजूरी करतो. यापूर्वीही त्यानं अमरनाथवर हल्ला केला होता. आम्ही त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानं पुन्हा त्रास दिल्यास तक्रार दाखल करू, असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर त्यानं हे असं कृत्य केल.”
 
अमरनाथने नुकताच आपला 15 वा वाढदिवस साजरा केला होता. आता त्याचं कुटुंबीय प्रशासनाकडून कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहेत.
 
आम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला...
या घटनेनंतर लोक अमरनाथजवळ पोहोचले तेव्हा त्याचा श्वास सुरू होता.
 
राममूर्ती रेड्डी सांगतात, "सकाळी पाच वाजले असतील. मी झोपलो होतो. बाहेरून काही आवाज येत होते. मी बाहेर पडलो आणि काय होत आहे ते पाहिलं. ते मूल गंभीररित्या भाजलं होतं. ते मला म्हणालं की, मी मुस्लैय्याहचा नातू आहे. मी एक घोंगडी आणली आणि त्याला झाकलं."
रेड्डी यांनी पुढे सांगितलं की, "तो म्हणत होता की अंगावर पाणी टाका. जेणेकरून त्याच्या शरिराला थंड वाटेल. पण, अशा स्थितीत पाणी टाकणं योग्य नाही, असं मी त्याला सांगितलं. आम्ही त्याच्या कुटुंबीयांना कळवायला जाईपर्यंत तोपर्यंत तो बोलत होता. रुग्णवाहिका येण्याची वाट पाहत असताना आम्ही त्याला एका गाडीत बसवलं. वाटेत एक रुग्णवाहिका दिसली आणि मग त्यात त्याला ऑक्सिजन देण्यात आला. पण त्याचं शरिर खूप भाजलं होतं. वाटेतच त्याचा मृत्यू झाला.”
 
मूर्ती रेड्डी या गावकऱ्यानं बीबीसीला सांगितलं, "आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत तिथं कोणीही नव्हते, फक्त अमरनाथ जखमी अवस्थेत होता. आग मक्याच्या पोत्यांपर्यंत पोहोचत होती. ती लगेच विझवण्यात आली.”
 
राजकारण
या प्रकरणातील आरोपी हा उच्चवर्णीय तर पीडित मागास जातीतील आहे. त्यामुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण आहे.
 
या घटनेवर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिघडलेली आहे हे दिसून येते.
 
रेपल्ले मतदारसंघाचे आमदार अनागनी सत्याप्रसाद यांनी चेरुकुपल्ली इथं धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागास जातीच्या लोकांना राज्यात सुरक्षा मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या घटनेची प्राथमिक माहिती गोळा करून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
रेपल्लेचे डीएसपी मुरली कृष्णा सांगतात की, पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडले जाईल.
 
बीबीसीशी बोलताना डीएसपी म्हणाले की, “हत्येव्यतिरिक्त आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याला लवकरात लवकर शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल.”
 
परिसरात तणाव
मृतक हा राजावोलू पंचायत अंतर्गत येणाऱ्या उप्पला वेरी पेलम गावचा रहिवासी आहे. दोन्ही ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
सत्ताधारी वायएसआरसीपीचे खासदार मोपीदेवी वेंकटरमन पीडित कुटुंबाला भेटायला गेले, तेव्हा टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि परिसरात तणाव निर्माण झाला.
 
ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सत्ताधारी खासदारालाही पीडितेच्या कुटुंबीयांच्या घरातून लवकर परतावं लागलं.
 
आरोपीचं कुटुंब एका छोट्या झोपडीत राहतं. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी घर सोडलं आहे. आरोपींची बाजू मांडण्यासाठी तिथं कुणीही उपस्थित नव्हतं.
 
दुसरीकडे, मृताचे कुटुंबीय आणि स्थानिक संघटनांनी मृतदेह चार तास रोखून धरत निषेध केला. अधिकाऱ्यांनी कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती