चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे थांबवीले

सोमवार, 15 जुलै 2019 (09:42 IST)
भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आलं. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. उड्डाण घेण्यासाठी ५६ मिनिटं बाकी असताना इस्रोनं तांत्रिक अडचणीमुळे ही मोहिम थांबवण्याची घोषणा केली. उड्डाणानंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे.
 
त्यासाठी इस्रोची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र क्रायोजिनिक इंजनच्या यंत्रणेत काही दोष आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. रॉकेटमध्ये जेवढं इंधन भरण्यात आले होते ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता इस्रोने व्यक्त केली आहे. रॉकेटमध्ये भरलेले सर्व इंधन खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती