एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही विभागातील जवानांना या निर्णयाचा लाभ मिळेल. १५ ऑगस्टपासून देशातील विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. इतर अनेक देशांमध्ये सैनिक असलेल्या प्रवाशांना विमानात चढताना अग्रक्रम देण्याची पद्धत अवलंबिली जाते. त्याच धर्तीवर एअर इंडियाने सदरचा निर्णय घेतला आहे. ‘एअर इंडिया’चे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग उबेरॉय यांनी ई-मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.
देशासाठी सैनिकांप्रती देशाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या योगदानाचा आमच्याकडून उचित सन्मान व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितले. त्यानुसार आता एअर इंडियाच्या विमानांमध्ये सैनिकांना प्रथम आणि बिझनेस श्रेणीच्या प्रवाशांच्या आधी चढू दिले जाईल. तसेच देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात सैनिकांना सवलत दिली जाईल, असे एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले.