व्यावसायिक परीक्षा मंडळाचे (व्यापम) संपूर्ण कामकाज पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येईल, असे या मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षांसाठी नव्या 'अॅप'चे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी सांगितले. हे अॅप 'डिजिटल इंडिया' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आल्याची माहिती त्यांनी व्यापमचे अध्यक्ष मदनमोहन उपाध्याय यांच्या उपस्थितीत दिली.
'व्यापम अॅप'ची सुरुवात हे 'डिजिटल इंडिया'च्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. त्याद्वारे आम्ही व्यापमच्या सर्व परीक्षा सुलभ करू शकू, तसेच परीक्षार्थी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया कुठल्याही अडचणीशिवाय ऑनलाइन करू शकतील, असे गुप्ता म्हणाले.
प्रवेश अर्ज, इच्छुक उमेदवारांचे तपशील, विविध परीक्षांच्या तारखा, प्रश्नोत्तर अधिकोष (क्वेश्चन- अॅन्सर बँक) इ. या अॅपवर उपलब्ध राहणार असून, यावरून प्रवेशपत्रही डाऊनलोड करता येईल अशी माहिती त्यांनी दिली. व्यापमसाठी इमेज स्कॅनरची सोयदेखील आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या सहायाने 'पाहुट' (प्री-आयुर्वेदिक, होमियोपॅथी व युनानी टेस्ट)साठी प्रवेश चाचणी येत्या ३० ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. व्यापमची ही पहिली ऑनलाइन परीक्षा राहणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळ या वर्षी दुप्पट, म्हणजे एकूण ३१ परीक्षा आयोजित करणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.