काय म्हणता, एकाच दिवसात सचिन वाझे यांची दोन वेळा बदली

शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:26 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना तात्काळ अटक करावी , अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा करत सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली केली जाणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर सचिन वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या SB 1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याने एकाच दिवसात सचिन वाझे यांची दोन वेळा बदली झाली. 
 
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यातच काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादात सापडले याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. दरम्यान, सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती